Ram Mandir: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सोमवार(दि.15) रोजी रांची येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त राज्य सचिव धनंजय सिंह यांनी धोनीला निमंत्रण पत्रिका दिली. 
सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आता धोनीलाही राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी 13 जानेवारी रोजी सचिन तेंडुलकरला त्याच्या मुंबईतील निवासस्थानी निमंत्रण मिळाले होते. भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस कर्मवीर सिंग आणि आरएसएशच्या धनंजय सिंह यांनी धोनीला निमंत्रण पत्रिका दिली.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देशातील 6000 हून अधिक लोकांना निमंत्रण पाठवणार आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी, खेळाडू, राजकीय नेत्यांसह अनेकांची उपस्थित असणार आहे. 
धोनी आयपीएलमध्ये खेळणार
अलीकडेच धोनी दुबईमध्ये कुटुंब आणि मित्रांसह नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या घालवून रांचीला परतला. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने रांची येथील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयपीएल 2024 साठी सराव सुरू केला आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. पण, आता धोनी आयपीएलमध्ये खेळणार असल्याची पुष्टी स्वतः धोनीने केली आहे.