World Cup 2011 MS Dhoni: २ एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील (History of Indian Cricket) अतिशय खास दिवस आहे. २०११ मध्ये याच दिवशी, महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेचा (Sri Lanka) पराभव करून एकदिवसीय विश्वचषक (One Day World Cup) जिंकला होता. १९८३ नंतर २०११ मध्ये भारताला हे विजेतेपद मिळालं होतं. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयाला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आयपीएल (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जनेही (Chennai Super Kings) हा खास सोहळा साजरा केला. CSK ने सोशल मीडियावर याचा एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचा हिरो धोनी केक कापताना दिसतोय.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २७७ धावा केल्या होत्या. महेला जयवर्धनेने नाबाद १०३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार कुमार संगकाराने ४८ आणि तिलकरत्ने दिलशानने ३३ धावा केल्या होत्या. भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाच्या ११४ धावांवर तीन विकेट्स गेल्या होत्या. गौतम गंभीर त्यावेळी क्रिजवर होता आणि युवराज बॅटिंगला येईल अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु त्यावेळी अचानक धोनी आला. हा टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यानं उत्तम बॅटिंग करत भारताला विजय मिळवून दिला. गौतम गंभीरनं ९७ धावा ठोकल्या, तर धोनीनं ७९ चेंडूंमध्ये नाबाद ९१ धावा केल्या.