MS Dhoni retirement plan in IPL: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या महिन्यात ४४ वर्षांचा झाला. तरीही तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून खेळत आहे. आयपीएलमध्ये सीएसकेसाठी पाच वेळा विजेतेपद जिंकणारा महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळेल की नाही याबद्दल अजूनही साशंकता आहे. याचदरम्यान, त्याच्या ताज्या विधानाने क्रिकेटचाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याने आयपीएलमधील भविष्यातील योजनेबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.
धोनी काय म्हणाला?
"मी आणि सीएसके, आम्ही एकत्र आहोत. आम्ही पुढील १५-२० वर्षे एकत्र राहू, पण आता असे वाटत नाही की मी पुढील १५-२० वर्षे खेळेन. आयपीएलमधले माझे खेळण्याचे दिवस मोजकेच असतील, पण मी नेहमीच सीएसकेसोबत राहीन. सीएसकेचा संघ ही एक-दोन वर्षांची गोष्ट नाही. मी नेहमीच पिवळ्या जर्सीमध्ये खेळेन. मी विश्वासाने सांगतो की काही काळानंतर मी खेळेन की नाही ते माहिती नाही, पण माझे हृदय नेहमीच सीएसकेशी जोडलेले राहील," असे महेंद्रसिंग धोनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हणाला.
"मी खेळेन की नाही तो वेगळा विषय, पण..."
महेंद्रसिंग धोनी पुढे म्हणाला, "मी नेहमीच म्हणतो की माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी बराच वेळ आहे. परंतु जर तुम्ही पिवळ्या जर्सीमध्ये परतण्याबद्दल विचारत असाल तर मी असे म्हणेन की मी खेळेन की नाही, तो वेगळा विषय आहे, पण मी नेहमीच पिवळ्या जर्सीमध्येच दिसेन. सीएसकेशी माझे नाते नेहमीच राहील. कारण सीएसकेने मला एक चांगला माणूस आणि क्रिकेटपटू बनण्यास खूप मदत केली."
आगामी हंगामात चांगली कामगिरी करणार
IPL 2025 मध्ये सीएसकेची कामगिरी चांगली नव्हती. ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी होते. त्यांना १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले होते. गेल्या हंगामात आमच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती, पण मला आशा आहे की आम्ही IPL २०२६ मध्ये चांगली कामगिरी करू, असेही धोनी म्हणाला.