CSK coach on MS Dhoni Batting Position: IPL 2025 सुरु होऊन एका आठवडा पूर्ण झाला. सर्व संघांचे कमीत कमी दोन सामने खेळून झाले. चाहत्यांना प्रत्येक टीमचा थोडाफार अंदाज आला आहेच. या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंग धोनीची. मुंबई विरूद्धचा सामना चेन्नई सहज जिंकला. पण त्यानंतर बेंगळुरू आणि राजस्थान या दोनही सामन्यात CSK चा पराभव झाला. बेंगळुरू विरूद्ध चेन्नईची फलंदाजी गडगडली, त्यावेळी धोनी चक्क नवव्या क्रमांकावर फलंदाजी आला. धोनीचा अनुभव पाहता, त्याने संघाचा विचार करून वरच्या क्रमांकावर खेळायला यावे अशी चाहत्यांची भावना आहे. पण धोनी शेवटची दोन-तीन षटके शिल्लक असतानाच खेळायला का येतो? याचे उत्तर CSKचे कोच स्टीफन फ्लेमिंग ( Stephen Fleming ) यांनी दिले आहे.
"धोनी फलंदाजीच्या क्रमवारीत इतका खाली का येतो याबद्दल चर्चा सुरू आहे. हा निर्णय सारासार विचार करूनच घेतला गेला आहे. धोनीला स्वत:चा अंदाज आहे. त्याचे गुडघे फिट आहेत पण तरीही ते पूर्वीसारखे नाहीत. तो मैदानावर चपळतेने हालचाली करतो, पण तरीही काही मर्यादा येतात. तो १० षटके बॅटिंग करू शकत नाही. त्यामुळे आता जे सुरु आहे ते त्याच्या आणि संघाच्या विचारानेच सुरु आहे. राजस्थान विरूद्धचा सामना जसा बॅलन्स होता, तसं काही असेल तर आम्ही त्याला थोडंसं लवकर खेळायला पाठवू शकतो. पण इतर वेळी तसे करता येत नाही आणि धोनीही इतरांना प्रोत्साहन देण्याच्या विचारात असतो," असे फ्लेमिंग म्हणाला.
"धोनीबद्दल मी मागच्या वर्षीदेखील बोललो आहे. आमच्या संघासाठी तो मौल्यवान आहे. तो संघात सर्व खेळाडूंना एकत्रित ठेवतो आणि विकेट किपिंगमध्ये खूप मोलाची भूमिका बजावतो. अशा वेळी त्याला नवव्या किंवा दहाव्या षटकात खेळायला पाठवणे योग्य नाही. आधीही तो इतक्या लवकर खेळायला उतरत नव्हता. एकदा १३-१४ षटकांचा खेळ झाला की आम्ही परिस्थितीचा अंदाज घेऊन धोनीला कधीही फलंदाजीला पाठवू शकतो," अशा शब्दांत फ्लेमिंगने संघ व्यवस्थापनच्या निर्णयाची पाठराखण केली.