ठळक मुद्देभारताचा पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजयमोहम्मद शमीला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारधोनीच्या 10 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची कोहलीकडून पुनरावृत्ती
नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने नेपियर येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर आठ विकेट राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली आणि भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच न्यूझीलंड दौऱ्यावर आला आहे आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी विजय मिळवला. या विजयाने कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या एका विक्रमाचा योग जुळवून आणला.
गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या खेळीला
विराट कोहली ( 45 )ची मिळालेली साथ यामुळे भारताने 156 धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने किवींच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या विजयाबरोबर कर्णधार म्हणून न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डेत विजय मिळवणारा कोहली दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी कॅप्टन कूल माहीने 2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पहिलाच सामना जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 बाद 273 धावा केल्या होत्या. त्यात वीरेंद्र सेहवाग ( 77), महेंद्रसिंग धोनी ( नाबाद 84) आणि सुरेश रैना ( 66) यांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. भारताने तो सामना डकवर्थ लुईस प्रणालीनुसार 53 धावांनी विजय मिळवला होता. योगायोगाची बाब म्हणजे कोहली व धोनी यांनी न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून मिळवलेला पहिला वन डे विजय हा नेपियरवरच ठरला.