रॉयल चॅलेंजर्स बेंगोलर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज (१० एप्रिल २०२५) आयपीएल सामना खेळला जाईल. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ ऐकमेकांशी भिडतील. या सामन्यात बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली आधीच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर ८ हजार १६८ धावा आहेत. पण आता त्याच्याकडे नवा पराक्रम करण्याची आणि मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ३५७ षटकार मारले आहेत. ख्रिस गेलचा हा विक्रम मोडणे कठीण आहे. या यादीत रोहित शर्मा एकूण २८२ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, विराट कोहलीच्या नावावर एकूण २७८ षटकार आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आणखी ५ षटकार लगावले तर तो रोहित शर्माला मागे टाकून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ फलंदाज
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने गेल्या चार वर्षांपूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी त्याचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत चेन्नई सुपरकिंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२५९ षटकार) चौथ्या आणि एबी डिव्हिलियर्स (२५१ षटकार) पाचव्या क्रमांकावर आहेत.