मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ऋषभ पंत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याबाबतीत त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजा यांना मागे टाकले आहे.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतला उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर ऋषभ पंतला मैदान सोडावे लागले. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला सहा आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर ऋषभ पंतला मँचेस्टर सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु, दुसऱ्या दिवशी शार्दूल ठाकूर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला फलंदाजासाठी मैदानात आल्याचे पाहून प्रेक्षकही भरावून गेले. त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून पंतच्या धाडसाचे कौतुक केले.
या सामन्यात ऋषभ पंतने ७५ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. या कामगिरीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऋषभने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९० षटकार मारले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवागच्या नावावरही ९० षटकारांची नोंद आहे. त्यानंतर रोहित शर्मा ८८ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनी (७८ षटकार) चौथ्या क्रमांकावर आहे. तर, पाचव्या स्थानावर असलेल्या रवींद्र जाडेजाने आतापर्यंत ७४ षटकार मारले आहेत.
कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय:
नाव | षटकार |
ऋषभ पंत | ९० |
वीरेंद्र सेहवाग | ९० |
रोहित शर्मा | ८८ |
महेंद्रसिंह धोनी | ७८ |
रवींद्र जाडेजा | ७४ |