भारताविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने दमदार कामगिरी करून दाखवली. या मालिकेत सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये त्याचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने ५३७ धावा केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षात रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लवकरच तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जो रूट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १५८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १३ हजार ५४३ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरचे नाव अव्वल आहे. सचिन तेंडुलकरने कसोटीत १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत, ज्यात ५१ शतकांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरचा हा विश्वविक्रम मोडण्यापासून जो रूट फक्त २ हजार ३७८ धावा दूर आहे. रूट ज्या प्रकारचा फॉर्ममध्ये आहे. यामुळे, तो येत्या दोन ते तीन वर्षांत तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. परंतु, यासाठी रूटला त्याची उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवावी लागेल आणि येणाऱ्या प्रत्येक कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करावे लागतील. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तेंडुलकरचा विक्रम मोडण्याबद्दल रूटला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, "मी याकडे लक्ष देत नाही, खेळताना अशा गोष्टी आपोआप घडल्या पाहिजेत."
जो रूटने २०१२ मध्ये इंग्लंड संघासाठी भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या पहिल्या काही वर्षांत तो चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु, २०२० पासून त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली आणि त्याने जगावर आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३९ शतके आणि ६६ अर्धशतके आहेत.