मेलबोर्न : आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी २०१५ च्या अॅशेस मालिकेदरम्यान वर्णद्वेषी टिप्पणी करीत आपली तुलना ‘ओसामा बिन लादेन’ याच्याशी केली होती, असा खळबळजनक खुलासा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने केला. मोईनच्या या आरोपाचा तपास करण्याचा निर्णय क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) घेतला आहे. इस्लाम धर्माचा अनुयायी असलेल्या मोईनने लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्वत:च्या आत्मचरित्रात हा दावा केला.
अॅशेस मालिकेतील कार्डिफ येथील पहिल्या कसोटीदरम्यान हा प्रसंग घडल्याचा मोईनने दावा केला. या सामन्याद्वारे मोईनने अॅशेसमध्ये पदार्पण केले होते. त्याने ७७ धावा काढल्या शिवाय पाच गडीदेखील बाद केले होते. हा सामना मात्र आॅस्ट्रेलियाने पाच गड्यांनी सहज जिंकला होता. मोईनने लिहिले, ‘माझ्या वैयक्तिक कामगिरीबाबतबोलायचे तर पहिली कसोटी माझ्यासाठी शानदार ठरली. पण एका घटनेमुळे मी विचलित झालो. आॅस्ट्रेलियाचा एक खेळाडू मैदानावर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘हे आव्हान स्वीकार कर ओसामा...’ मी जे एकेले त्यावर विश्वासच बसत नव्हता. मी रागाने लालबुंद झालो होतो. क्रिकेट मैदानावर ‘तसा’ राग मला कधीही आला नव्हता. त्या खेळाडूने काय म्हटले, हे मी अन्य दोन खेळाडूंना सांगितले होते. माझ्यामते इंग्लंडचे कोच ट्रॅव्हर बेलिस आणि आस्ट्रेलियाचे कोच डेरेन लेहमन यांच्यात या मुद्यावर नक्कीच बोलणे झाले होते.’
मोईनच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सीएच्या प्रवक्त्याने अशा प्रकारची वर्णद्वेषी टिप्पणी मान्य नाही. क्रिकेट आणि सामाजिक जीवनात अशा वक्तव्यांना कुठलेही स्थान नसून आम्ही हे प्रकरण गंभीरपणे हाताळू, असे सांगितले.