Mohammed Siraj Record : भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानात अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून दाखवला. या विजयात मोहम्मद सिराज सर्वात आघाडीवर राहिला. 'पंजा' मात त्याने भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आपली भूमिका चोख बजावताना त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्सचा डाव साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी सर्वाधिक चेंडू फेकण्याचाही विक्रम
या कामगिरीसह त्याने सामनावीर पुरस्कार मिळवला. एवढेच नाही तर या मालिकेत त्याने सर्वाधिक २३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. कसोटी कारकिर्दीत एका मालिकेत केलेली ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने २० विकेट्स घेतल्या होत्या. हा डाव साधण्यासाठी त्याने मालिकेत सर्वाधिक चेंडू फेकले. हा देखील एक रेकॉर्डच आहे. इथं एक नजर टाकुयात त्याने केलेल्या महा पराक्रमासंदर्भातील खास गोष्ट
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
दोघांनी मालिकेत १००० पेक्षा अधिक चेंडू फेकले
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजनं जी शेवटची विकेट घेतली ती १८५.३ व्या षटकात. म्हणजे या मालिकेत त्याने एकूण १११३ चेंडू टाकले. त्याच्या पाठोपाठ क्रिस वोक्स याने सर्वाधिक षटके फेकली. खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावातील १४ षटकांसह क्रिस वोक्सने या मालिकेत १८१ षटके गोलंदाजी केली. त्याने तब्बल १०८६ चेंडू फेकले. जसप्रीत बुमराहनं ११९.४ षटकांसह ७१८ चेंडू फेकले.
चार वर्षांनी इंग्लंडमध्ये १००० पेक्षा अधिक चेंडू फेकणारा पहिला
मोहम्मद सिराज हा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १००० पेक्षा अधिक चेंडू टाकणारा २८ वा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहनं २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हजारपेक्षा अधिक चेंडू फेकले होते. चार वर्षांनी असा पराक्रम करणारा मोहम्मद सिराज हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला
भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा चांगलाच गाजला. पण तुम्हाला कदाचित पटणार नाही, सर्वाधिक षटके फेकण्याचा भार हा सिराजवर आहे. बुमराहाच्या सोबत अन् बुमराहच्या अनुपस्थितीत दोन्ही वेळी तो टीम इंडियासाठी आपली ताकदपणाला लावताना पाहायला मिळाले आहे. चेंडू हातात मिळाला की, जोर लावून बॉलिंग करायची हा एकच फॉर्म्युला त्याला माहिती आहे. मी माझ्यासाठी नाही तर देशासाठी चेंडू फेकतोय, त्यामुळे वर्कलोडचा विचारच मनात येत नाही, ही गोष्टही सिराजनं ओव्हल कसोटी सामन्यानंतर बोलून दाखवली आहे.