भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्या सत्रात जेमी स्मिथची विकेट घेतली तेव्हा त्याने वेगळ्या पद्धतीने सेलीब्रेशन केले. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. सिराजने आता बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या सेलिब्रेशनमागील कारण सांगितले आहे.
लिव्हरपूलकडून खेळणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू डिओगो जोटा याचे ३ जुलै रोजी कार अपघातात निधन झाले. त्याच्या निधानाची बातमी कळताच संपूर्ण जग हादरून गेले. सिराजसाठीही हा मोठा धक्का होता. नुकताच बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवरून सिराजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सिराज म्हणाला की, डिओगो जोटा कार अपघातात मरण पावल्याची माहिती आम्हाला मिळाली. मी पोर्तुगालचा चाहता आहे. कारण रोनाल्डो देखील त्याच संघाकडून खेळतो. आयुष्यात काहीही ठरलेले नाही. आपल्यासोबत उद्या काय घडेल, हे कोणालाच माहिती नाही.
लॉर्ड्स मैदानावर खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सिराजने स्मिथची विकेट घेतल्यानंतर आकाशाकडे पाहिले आणि आपल्या बोटाने २० क्रमांकाचा इशारा केला. सिराजने आपल्या इशाऱ्यातून डिओगो जोटाला श्रद्धांजली वाहिली. डिओगो जोटाच्या कारला अपघात झाला होता, तेव्हा त्याचा लहान भाऊदेखील त्याच्यासोबत होता. त्यानेही या अपघातात आपला जीव गमावला.
इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केली आणि दोन विकेट्स घेतल्या. सिराजने स्मिथ व्यतिरिक्त ब्रायडन कार्सला आपल्या जाळ्यात अडकवले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर, नितीश रेड्डीने दोन विकेट्स मिळवल्या. तर, रवींद्र जाडेजाने एक विकेट्स घेतली.