Join us

Ind Vs Aus: टीम इंडियाला मोठा झटका; मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर, कसोटी मालिकेतून बाहेर

India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारताचे स्टार खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यालाही दुखापत असल्याने तो या दौऱ्यावर येऊ शकलेला नाही. रविंद्र जडेजादेखील दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळू शकला नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 22:33 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. अॅडलेड टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. रिटायर्ड हर्ट होत तो माघारी परतला. तो मैदानावर परत आलाच नाही. आता त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. यामुळे तो टेस्ट सिरीजमधून बाहेर पडला आहे. 

मोहम्मद शमी क्षेत्ररक्षणासाठीदेखील मैदानावर आला नव्हता. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. टीम इंडिया पहिली कसोटी जिंकेल, असा दावा करणारे तोंडावर पडले. भारताच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडा गाठता आला नाही. शिवाय कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. ऑस्ट्रेलियानं पहिली कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

१ बाद ९ अशा धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठीचे ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडियाला मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) रुपानं आणखी एक धक्का बसला आहे. हाताला फ्रॅक्चर असल्याने शमी दुसरी कसोटी खेळणे कठीण बनले आहे. यामुळे उरलेल्या तीन टेस्ट तो खेळू शकणार नाही. 

भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी माफक ९० धावांचे लक्ष्य राहिले. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताला ९ बाद ३६ धावांवर खेळ थांबवावा लागला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला बुमराह ( २) माघारी परतला. त्यानंतर अन्य फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तेही अपयशी ठरले. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकले नाहीत. आर अश्विनही शून्यावर बाद झाला. विराट कोहली ( ४), पृथ्वी शॉ ( ४), हनुमा विहारी (८), वृद्धीमान सहा ( ४), उमेश यादव ( ४*) हेही एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियाचा एकही शिलेदार दुहेरी धावसंख्या करू शकला नाही. २२व्या षटकात मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्यानं भारताचा डाव ९ बाद ३६ धावांवर संपुष्टात आला. 

९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड व जो बर्न यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांचा मजबूत पाया रचला. वेड ३३ धावांवर धावबाद झाला. जो बर्न ६३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर नाबाद राहिला. मार्नस लाबुशेन ६ धावांवर बाद झाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारताचे स्टार खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यालाही दुखापत असल्याने तो या दौऱ्यावर येऊ शकलेला नाही. रविंद्र जडेजादेखील दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळू शकला नाही. 

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया