गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियापासून दूर असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत निवडकर्त्यांना आरसा दाखवला. उत्तराखंडविरुद्ध झालेल्या एलिट ग्रुप सी सामन्यात बंगालचे प्रतिनिधित्व करताना शमीने एकूण सात विकेट्स घेऊन आपल्या तंदुरुस्तीचा पुरावा दिला.
बंगालने हा सामना जिंकला, ज्यात शमीच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा होता. या सामन्यात त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या. पहिल्या डवात त्याने ३७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ३८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर शमीला इंग्लंड दौरा, आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडले गेले नव्हते. आता, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही भाग नाही.मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शमीच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि सांगितले होते की तो तंदुरुस्त असता तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नक्कीच संधी मिळाली असती. यावर शमीने आपली नाराजी व्यक्त करत थेट आगरकर यांच्यावर टीका केली.
शमी काय म्हणाला?
"निवड माझ्या हातात नाही. जर काही तंदुरुस्तीची समस्या असते तर मी बंगालकडून खेळलो नसतो. मी चार दिवसांचा क्रिकेट सामना खेळू शकतो, तर मी ५० षटकांचा एकदिवसीय सामना देखील सहज खेळू शकतो. मला जास्त काही सांगण्याची गरज नाही आणि मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही", असे शमी म्हणाला.
शमीने शेवटचा कसोटी सामना कधी खेळला?
दुखापतीतून बरे झाल्यानंतर मोहम्मद शमीने फक्त नऊ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शमीने जून २०२३ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अजित आगरकरने यापूर्वी सांगितले होते की, शमीला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी काही रेड-बॉल सामने खेळावे लागतील. आगरकर म्हणाला होता, "एक खेळाडू म्हणून, तो काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे, परंतु त्याला काही दिवस क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे."