Join us  

"पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये पोहचून भारताला हरवलं तर मी पठाणपेक्षा चांगला डान्स करेन"

सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर खेळत असलेल्या पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 12:02 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघाची विजयाची गाडी पटरीवरून घसरली अन् शेजाऱ्यांना सलग चार पराभवांचा सामना करावा लागला. सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर खेळत असलेल्या पाकिस्तानने आपल्या सलामीच्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला. याशिवाय दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून विजयरथ कायम ठेवला. पण, विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या इराद्याने भारतासमोर आलेल्या बाबर आझमच्या संघाची फजिती झाली. रोहितसेनेने मोठा विजय मिळवून शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. पण, बांगलादेशला नमवून पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. 

पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय नेटरनरेटमुळे इतर संघावर देखील अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तानला नेहमीप्रमाणे साखळी फेरीच्या सामन्यात भारताकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. परंतु, पाकिस्तानचे माजी खेळाडू भन्नाट विधानं करून आपल्या संघावर टीका करत असतात. अशातच माजी गोलंदाज मोहम्मद आमिरने एक अजब विधान केले.

पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठून भारताचा पराभव केला तर मी इरफान पठाणपेक्षा चांगला डान्स करेन असे आमिरने म्हटले. तो पाकिस्तानातील 'जिओ सुपर' या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलत होता. यावेळी माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक आणि इमाद वसीम हे देखील उपस्थित होते. खरं तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने राशिद खानसोबत ठेका धरला होता. याचाच दाखला देत आमिरने पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीत पोहचून भारताला पराभूत करण्याचे आव्हान दिले. 

पाकिस्तानचा दारूण पराभवसाखळी फेरीतील सामन्यात शेजाऱ्यांचा दारूण पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली होती. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानइरफान पठाणअफगाणिस्तान