Join us

"PSL सामन्यादरम्यान उपायुक्तांनी कुटुंबीयांसोबत...", पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप

सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 14:37 IST

Open in App

पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या धर्तीवर शेजारील देशात ही ट्वेंटी-२० लीग खेळवली जाते. नाना कारणांनी चर्चेत राहणारी ही स्पर्धा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचे दिसते. याचे कारणही हटके असून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने काही गंभीर आरोप केले आहेत. तो पीएसएलमध्ये सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या संघाचा भाग आहे. आमिरने मुल्तानच्या उपायुक्तांवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली. 

रविवारी मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना खेळवला गेला. २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आमिरने केला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा क्वेटा ग्लॅडिएटर्सचा स्टार मोहम्मद आमिरने मुल्तानच्या उपायुक्तांवर जोरदार टीका केली.

त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मुल्तानच्या उपायुक्तांच्या अस्वीकार्य वर्तनामुळे मला धक्काच बसला, त्यांनी माझ्या कुटुंबीयांशी गैरवर्तन केले आहे. मैदानावर मालकी सांगत त्यांनी सामन्यादरम्यान माझ्या कुटुंबीयांना अन्यायकारकपणे बाहेर काढले. सत्तेचा हा दुरुपयोग असह्य आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की, त्यांनी तातडीने कारवाई करावी. मरियम नवाझ शरीफ कृपया मला आशा आहे की, तुम्ही कारवाई कराल.

दरम्यान, सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामाचा थरार रंगला आहे. सहा फ्रँचायझी एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. मुल्तान सुल्तान, क्वेटा ग्लॅडिएटर्स, कराची किंग्ज, पेशावर झाल्मी, लाहोर कलंदर्स आणि इस्लामाबाद युनायटेड हे सहा संघ पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्ड