Join us  

मिताली राजचे इंग्लंडविरुद्ध झुंजार अर्धशतक

भारताची घसरगुंडी : केट क्रॉसने बाद केला अर्धा संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 5:12 AM

Open in App
ठळक मुद्देजेमिमा रॉड्रिग्ज पुन्हा अपयशी ठरली. गेल्या अनेक सामन्यांपासून तिला कामगिरीत सुधारता न आल्याने भारताची चिंता वाढली आहे

टाँटन : पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर फलंदाजी कोलमडल्याने भारतीय महिला क्रिकेट संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध अडचणीत आला. कर्णधार मिताली राजच्या शानदार अर्धशतकामुळे भारताला दोनशेचा पल्ला पार करता आला. ५० षटकांत भारताचा डाव २२१ धावांत संपुष्टात आला.

एका बाजूने प्रमुख फलंदाज एकामागून एक तंबूत परतत असताना कर्णधार मिताली राजने एकाकी झुंज देताना ९२ चेंडूंत ७ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली. मितालीचे कारकीर्दीतील हे ५७ वे अर्धशतक होते. शेवटचे वृत्त लिहिपर्यंत इंग्लंड २२२ धावांचा विजयी पाठलाग करताना १९ षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात ८२ पर्यंत वाटचाल केली होती.पहिला सामना ८ विकेट्सने गमावल्याने भारतीयांना मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विजय अनिवार्य आहे. भारताने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दमदार सुरुवातही केली. स्मृती मानधना आणि युवा शेफाली वर्मा यांनी ५६ धावांची सलामी दिली. मात्र, यानंतर भारताचा डाव घसरला.

केट क्रॉसने मानधनाचा बहुमूल्य बळी मिळवत भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि बघता बघता भारताचा डाव कोलमडण्यास सुरुवात झाली. मानधनाने ३० चेंडूंत २२ धावा केल्या. दुसरीकडे शेफाली भारताला सावरत होती. तिने ५५ चेंडूंत ७ चौकारांसह ४४ धावा फटकावल्या. मात्र स्थिरावल्यानंतर ती बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.

जेमिमा रॉड्रिग्ज पुन्हा अपयशी ठरली. गेल्या अनेक सामन्यांपासून तिला कामगिरीत सुधारता न आल्याने भारताची चिंता वाढली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौर (१९), दीप्ती शर्मा (५), स्नेह राणा (५) व तानिया भाटिया (२) हेही अपयशी ठरल्याने भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली. परंतु, मितालीने एक बाजू लावून धरल्याने संथ गतीने का होईना, भारताचा धावफलक हलता राहिला. मध्यमगती गोलंदाज केट क्रॉसने ३४ धावांत ५ बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. सोफी एक्लेस्टोनने ३ बळी घेत तिला चांगली साथ दिली.

टॅग्स :मिताली राजभारतीय क्रिकेट संघ