मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श हा रॅपिड अँटिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अनिवार्य आरटीपीसीआर चाचणीत मात्र सोमवारी निगेटिव्ह येताच दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा लाभला. आयपीएलमध्ये बुधवारी होणाऱ्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याला आता कुठलाही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.
फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अपवाद वगळता दिल्ली संघातील सर्व सदस्य आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आले. फरहार्ट हे संक्रमित झाल्यामुळे क्वारंटाईन आहेत. मार्शची चाचणी मात्र निगेटिव्ह आल्याचे बीसीसीआयने सांगितले. आरटीपीसीआर चाचणीला अधिकृत मानले जाते. याआधी मार्तला कोरोनाची लक्षणे दिसताच त्याची रॅपिड ॲंटिजन चाचणी घेण्यात आली होती. तो त्यात पॉझिटिव्ह आला. याचे कारण असे की फरहार्ट यांच्या मार्गदर्शनात मार्श रिहॅबिलिटेशनमध्ये होता. त्याच्यात तापाची हलकी लक्षणे आढळून आली होती. दिल्ली संघाला आजच पुण्याकडे रवाना व्हायचे होते. मात्र, सर्व खेळाडू हॉटेलच्या खोलीतच थांबले. सर्वांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. संघाच्या मसाजरलादेखील कोविडची लक्षणे दिसत होती; मात्र आरटीपीसीआर चाचणीत तोदेखील निगेटिव्ह आला.
सर्वच संघ पुण्याच्या कॉनरॉड हॉटेलमध्ये थांबले असून, बीसीसीआयने येथेच बायोबबल निर्माण केले आहे. संघातील खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे दिल्ली संघ आज, मंगळवारी पुण्याकडे प्रस्थान करेल. बीसीसीआयच्या नव्या प्रोटोकॉलनुसार संघातील प्रत्येक सदस्याचे प्रत्येक पाचव्या दिवशी परीक्षण होते. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवासाची परवानगी असते. याशिवाय फ्रँचाइजीदेखील आपल्या खेळाडूंची चाचणी करू शकते.