Join us

मिलियन ड्रीम! सचिन तेंडुलकरची स्वप्नपूर्ती अन् क्रिकेटची भविष्याच्या दिशेने क्रांती

स्वदेश घाणेकर, क्रीडा प्रतिनिधी वर्ल्ड कप २०११... गौतम गंभीरची चिवट खेळी... कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अन् वानखेडे स्टेडियमच्या ...

By स्वदेश घाणेकर | Updated: November 19, 2023 08:44 IST

Open in App

स्वदेश घाणेकर, क्रीडा प्रतिनिधी 

वर्ल्ड कप २०११... गौतम गंभीरची चिवट खेळी... कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अन् वानखेडे स्टेडियमच्या आत अन् बाहेर झालेला अविश्वसनीय जल्लोष... भारतीय संघ रविवारी पुन्हा एकदा हा इतिहास लिहिण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरणार आहे. स्टेडियम व प्रतिस्पर्धी वेगळे असले तरी उत्साह, भावना त्याच आहेत... पण २०११चा वर्ल्ड कप हा आजही मनामनांत साठवून ठेवणारा आहे आणि त्याला कारण म्हणजे वन अँड ओन्ली आपला तेंडल्या... अर्थात, सचिन रमेश तेंडुलकर...

सचिन तेंडुलकरने २२-२३ वर्षे क्रिकेटची सेवा केली, अनेक वैयक्तिक विश्वविक्रम नोंदवले, घरातील चषकांच्या कपाटात एक ट्रॉफी नसल्याची खंत त्याच्यासह कोट्यवधी चाहत्यांना होती. २०११चा वर्ल्ड कप हा त्याच स्वप्नपूर्तीसाठीची शेवटची संधी होती. त्यामुळेच वर्ल्ड कप इमोशन म्हणून खूप महत्त्वाचा होता... मास्टर ब्लास्टर ती वर्ल्ड कप ट्रॉफी उचलतानाचा क्षण आजही डोळ्यांसमोर ताजा आहे... वानखेडे स्टेडियमवरून सचिनने क्रिकेटचा श्रीगणेशा केला, तिथेच वर्ल्ड कप उंचावला... सचिनच्या मनात तेव्हा काय सुरू असेल हे तोच जाणे... पण, एकीकडे सचिनची कारकीर्द शेवटाकडे झुकलेली, तेच भारताच्या भविष्याची पिढी तयार राहिली होती... विराट कोहली हा त्याच बॅचमधील खेळाडू.. युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, युसूफ पठाण, झहीर, भज्जी, मुनाफ यांनीही त्यांच्या कारकिर्दीचा एक टप्पा पार केला होता. या संघातील विराट व आर. अश्विन हे दोन खेळाडूच २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे सदस्य आहेत...

कॅन्सरशी संघर्ष करत असतानाही युवराज सिंगने २०११चा वर्ल्ड कप राजासारखा गाजवला... त्याच्या तोंडातून रक्तही पडताना अनेकांनी पाहिले. हा वर्ल्ड कप उंचावण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता आणि धोनीने जेव्हा षटकार खेचला तेव्हा युवी नॉन स्ट्राईकवर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडलेला.. गौतम गंभीरची ९७ धावांची खेळी विसरून चालणार नाही.. भारतासाठी महत्त्वाच्या सामन्यांत तो नेहमीच उभा राहिलेला आहे, पण त्याचे हवे तसे श्रेय त्याला मिळाले नाही, हेही खरे आहे. झहीर खानची कामगिरी उल्लेखनीय होती... या सर्व खेळाडूंना पाहत विराट तयार होत होता आणि आज तो एक महान खेळाडू म्हणून जगासमोर उभा आहे...

भारतीयांचे मिलियन ड्रीम तेव्हा पूर्ण झाले होते आणि २०२३ मध्ये पुन्हा तो क्षण अनुभवण्यासाठी सारे सज्ज आहेत...

 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ