नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगची (आयपील) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (आरसीबी) क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन भारतात एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत अडकून पडल्यानंतर मंगळवारला न्यूझीलंडला परतले.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक हेसन आयपीएलच्या नव्या मोसमासाठी ५ मार्चला भारतात दाखल झाले होते, पण कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन आणि विमान सेवा उपलब्ध नसल्यामुळे ते येथे अडकून पडले.
हेसन यांनी टिष्ट्वट केले, ‘मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी बसमध्ये घालविलेल्या एक दिवसानंतर काय शानदार दृश्य होते. न्यूझीलंडपर्यंत आमच्या परतीच्या प्रवासादरम्यान फ्लाईएअरएनजेडच्या कर्मचाऱ्यांचा व्यवहार फार चांगला होता.’
हेसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील न्यूझीलंड उच्चायोग, न्यूझीलंडचे विदेश मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्याप्रति आभार व्यक्त केले. (वृत्तसंस्था)