क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान आता टी-२० विश्वचषकात समोरासमोर येणार आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवर मोठे विधान केले. भारत आणि पाकिस्तानने केवळ मर्यादित षटकांचेच नाही, तर कसोटी सामनेही खेळले पाहिजेत, अशी मागणी वॉनने केली आहे.
पाकिस्तानने टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्याबाबत घेतलेल्या यू-टर्ननंतर वॉनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्याने म्हटले आहे की, "भारत आणि पाकिस्तानला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहणे हे क्रिकेटसाठी उत्तम ठरेल. तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यासाठी युनायटेड किंगडम हे सर्वात योग्य आणि तटस्थ ठिकाण असेल." पाकिस्तानने यापूर्वीही सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडला आपले 'होम ग्राउंड' म्हणून वापरले आहे, हाच धागा पकडून वॉनने आपली इच्छा व्यक्त केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ८ डिसेंबर २००७ रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. ती मालिका भारताने १-० ने जिंकली होती. त्यानंतर गेल्या १७ वर्षांपासून दोन्ही देश पांढऱ्या कपड्यात आणि लाल चेंडूने एकमेकांविरुद्ध मैदानात उतरलेले नाहीत. २०१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली, त्यानंतर हे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषकाच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात.
मायकल वॉन याने भारत आणि पाकिस्तान दरम्यान इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळवण्याचा सल्ला दिला खरा, मात्र त्याचे हे 'प्रेम' भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वॉनच्या या प्रस्तावाचा समाचार घेत त्याला खडेबोल सुनावले आहेत. वॉनच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने इंग्लंडच्या इतिहासातील दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. त्याने विचारले की, "दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानसोबत भारताने का खेळावे? उद्या जर इंग्लंडने 'आयर्लंड रिपब्लिकन आर्मी' सोबत द्विपक्षीय मालिका खेळली, तर भारताला त्याचे यजमानपद भूषवताना नक्कीच आनंद होईल. तेव्हा तुम्हाला कसे वाटेल?" दुसऱ्या एका संतप्त चाहत्याने लिहिले की, "भारतातील कोणताही सुज्ञ आणि स्वाभिमानी माणूस दहशतवादी राष्ट्राशी क्रिकेट खेळू इच्छित नाही. त्यामुळे तुमचा हा फुकटचा सल्ला तुम्ही तुमच्या मनातच ठेवलेला बरा."