Join us

मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का, दुखापतीमुळे आणखी एक खेळाडू स्पर्धेबाहेर!

Chennai Super Kings: कर्णधार ऋतुराज गायकवाडनंतर संघातील आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:30 IST

Open in App

आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात येत्या २० एप्रिलला क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याआधी चेन्नईच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आली. कर्णधार ऋतुराज गायकवाडनंतर संघातील आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे आधीच खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या चेन्नईसमोर मोठे आव्हान आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम चेन्नईच्या संघासाठी अत्यंत खराब ठरला आहे. चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांना सात पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. अशाचत चेन्नईचा गुरनजप्रीत दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला.

गुरजनप्रीत सिंहच्या जागी 'बेबी एबी' म्हणून ओळखला जाणारा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीसला संधी देण्यात आली. चेन्नईने त्याला २ कोटी २० लाख रुपयांत करारबद्ध केले. डेवाल्डची गणना जगभरातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८१ टी-२० सामन्यात एकूण १ हजार ७८७ धावा केल्या आहेत. त्याच्याकडून चेन्नईच्या संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

डेवाल्डने आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान, २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ७ सामन्यात २३ च्या सरासरीने १६१ धावा केल्या. त्यानंतर २०२३ मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या हंगामात मुंबईकडून खेळताना त्याने ३ सामन्यात ६९ धावा केल्या आहेत. डेवाल्डच्या आयपीएल कारकि‍र्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने एकूण १० सामन्यात २३० धावा केल्या आहेत. गुरनजप्रीतच्या जागी चेन्नईच्या संघाने डेवाल्डची निवड केली असली तरी, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्स