चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात चिंता वाढवणारे वृत्त आले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) मागील आठवड्यात आजारी पडला होता. त्यात MIच्या ताज्या ट्विटमुळे रोहित आजच्या सामन्याला मुकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रोहितच्या अनुपस्थितित सलामीला ख्रिस लिनला संधी मिळण्याची चर्चा आहे आणि MIने ट्विट करून लिनची फिरकी घेतली आहे.
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर मागील २४ तासांत लिनचे अनेक फोटो व व्हिडीओ अपलोड केले गेले आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्ध लिनला खेळण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यासाठी गुरुवारी झालेल्या सराव सत्रात लिननं जोरदार फटकेबाजी केली.
आयपीएल 2020च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं २ कोटीच्या मुळ किंमतीत लिनला आपल्या ताफ्यात घेतले. पण, आतापर्यंत रोहित आणि क्विंटन डी'कॉक यांनाच संधी दिल्यानं लिन बाकावर बसून होता. डी'कॉकच्या कामगिरीचा आलेख चढाच राहिल्यानं फ्रँचायझीनं त्याला बसवण्याचा विचारही केला नाही. पण, आता मॅनेजमेंटनं संघात बदल करण्याचा विचार सुरू केला आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला लिन हा पर्याय संघाकडे आहे आणि त्यासाठी अंतिम ११मधून नॅथन कोल्टर-नायलला विश्रांती दिली जाऊ शकते. जेम्स पॅटिन्सनच्या जागी कोल्टर-नायलला दोन सामन्यांसाठी संधी दिली गेली होती. रोहितच्या अनुपस्थितित डी'कॉक आणि लिन सलामीला येतील आणि उपकर्णधार किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व सांभाळेल. ट्रेंट बोल्ट हा चौथा परदेशी खेळाडू संघात असेल. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
लिनच्या नावावर आयपीएलमध्ये १२८० धावा आहेत. यापूर्वी त्यानं डेक्कन चार्जर्स व कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आजच्या सामन्यातील विजय मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफमधील स्थान पक्के करेल, तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSKचे आव्हान संपुष्टात आणेल.