नवी दिल्ली : मानसिकदृष्ट्या कणखर राहा आणि कोविड-१९ नंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल त्यावेळी फिटनेससह पुनरागमन करा, असा सल्ला भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांनी खेळाडूंना दिला आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे क्रिकेट ठप्प झाल्यानंतर इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय सामना पुढील महिन्यात जैविक रूपाने सुरक्षित वातावरणात खेळला जाणार आहे. भारतीय संघाला मात्र नजीकच्या कालावधीत कुठला क्रिकेट सामना खेळायचा नाही.
स्टार स्पोर्ट््सने पाटील यांच्या हवाल्याने म्हटले की,‘हा अनिश्चिततेचा कालावधी आहे. कुठल्याही खेळाडूसाठी दुखापतीविना पुनरागमन करणे मोठे आव्हान आहे. सर्व आव्हानांना कणखर मानसिकतेने सामोरे जाणे आवश्यक आहे, हे खेळाडूंनी समजून घ्यायला हवे. तुम्हाला सावध सुरुवात करावी लागेल आणि दुखापतग्रस्त होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. केनिया संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात मी नेहमी कुठल्या स्पर्धेपूर्वी खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत असावे, यावर लक्ष देत होतो.’
भारतातर्फे १९८० ते १९८४ या कालावधीत २९ कसोटी खेळणाऱ्या ६३ वर्षीय पाटील यांनी १९८३ च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या विजयाचे उदाहरण दिले. (वृत्तसंस्था)