मेलबोर्न : येथील रॉकबॅक उपनगरात नवी रहिवासी कॉलनी उभारण्याचे काम सुरू आहे. या कॉलनीत सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांवर बंगले आणि रस्त्यांची नावे ठेवली जाणार आहेत. एकोलेड इस्टेटद्वारा उभारण्यात येत असलेल्या या कॉलनीत सचिन ड्राईव्ह, कोहली क्रिसेंट आणि कपिल देव टेरेस हे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र असतील.
या परिसरातील रस्ते आणि उपरस्त्यांची नावे वॉ स्ट्रीट, मियांदाद स्ट्रीट, अॅम्ब्रोस स्ट्रीट, सोबर्स ड्राईव्ह, कॅलिस वे, हेडली स्ट्रीट आणि अक्रम वे अशी असतील. मेल्टन कौन्सिलअंतर्गत असलेले ‘रॉकबॅक’ उपनगर भारतीय लोकांच्या वास्तव्याचे आवडीचे स्थान आहे. येथे घर खरेदीस पसंती दिली जाते. बिल्डर रेसी व्हेंचरचे संचालक खुर्रम सईद म्हणाले, ‘कौन्सीलकडे आम्ही ६० नावे पाठविली होती. त्यात महान सर डॉन ब्रॅडमन यांचे नाव रस्त्याला द्यायचे होते. मेलबोर्नमध्ये त्यांच्या नावाचा रस्ता अस्तित्वात असल्यामुळे मंजुरी मिळाली नाही.
कुमार संगकारा, राहुल द्रविड, महेद्रसिंग धोनी यांची नावेदेखील रस्त्याला देण्याची मंजुरी मिळू शकली नाही. सचिन आणि कोहलीच्या नावाला मंजुरी प्रदान केली आहे. कोहली माझा आवडता फलंदाज असून येथील सर्वांत महागड्या मार्गाला त्याचे नाव देण्यात आले आहे’ असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)