Join us  

'निकाल' लावणाऱ्या सामन्यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा फक्त षटकारांचा सराव! पण का ?

केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेगळया प्रकारचा अनोखा सराव केला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीय.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:31 AM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी लढतीआधी मालिका विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आतापर्यंत या मैदानावर 15 सामन्यात 30 डाव झाले असून दहावेळाच एखादा संघ 150 च्या पुढे मजल मारु शकला आहे.

केपटाऊन - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी लढतीआधी मालिका विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आज अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चिंधडया उडवल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. 

केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेगळया प्रकारचा अनोखा सराव केला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीय तसेच इथे खेळणाऱ्या संघांना टी-20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी करता येत नाही. त्यामुळे धावाही फारशा होत नाहीत. टी-20 चा विचार केल्या हे लो स्कोरिंग मैदान आहे. खेळपट्टी उत्तम आहे पण ग्राऊंडचे आकारमान मोठे असल्यामुळे इथे चौकार-षटकार ठोकणे फलंदाजांसाठी सोपे नसते. 

इतर स्टेडियमच्या तुलनेत इथे सीमारेषा लांब असल्यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळता येत नाहीत. आतापर्यंत या मैदानावर 15 सामन्यात 30 डाव झाले असून दहावेळाच एखादा संघ 150 च्या पुढे मजल मारु शकला आहे. याच गोष्टी ध्यानात घेऊन शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वेगळाच सराव केला. प्रॅक्टीस सेशन दरम्यान फलंदाजांना चेंडू सीमापार मारण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. जो फलंदाज षटकार ठोकू शकणार नाही तो बाद अशा पद्धतीचा हा सराव होता. आफ्रिकेच्या ज्या फलंदाजांना चेंडू सीमापार पोहोचवता आला नाही त्यांना बाद ठरवून नव्या फलंदाजाला संधी मिळत होती. या सरावा दरम्यान आफ्रिकेच्या फलंदाजांनी गगनभेदी षटकार ठोकले. विराट सेनेसाठी ही बातमी निश्चित चिंता वाढवणारी आहे. या सरावादरम्यान फलंदाजांना पॅड बांधण्याची परवानगी नव्हती. त्यांना हात मोकळे ठेऊन मोठे फटके मारता यावेत यासाठी असे करण्यात आले होते. त्याचवेळी सीमारेषेवर आठ ते दहा खेळाडूंना उभे केले होते. जेणेकरुन फलंदाजाच्या मनात झेलबाद होण्याची भिती राहिली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जवळपास 45 मिनिटे अशा प्रकारचा सराव केला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८