- एबी डिव्हिलियर्स लिहितो...
वय वाढताना कधी कधी चुका होतात. त्यात कमीपणा मानण्याचे कारण नाही. स्वत:ला फिट राखणे महत्त्वाचे आहे. जिममध्ये व्यायाम करणे ही आयपीएलची गरज आहे. सामने साडेतीन तासात संपायला हवे. त्यात दोन्ही डाव, टाइमआऊट आणि ब्रेक हे सर्व सोपस्कार समाविष्ट आहेत. पण यंदाच्या आयपीएलमधील सामने चार तासांपेक्षा अधिक वेळ चालत आहेत. ८ वाजता सुरू झालेला सामना अर्ध्या रात्रीपर्यंत चालतो. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना सुपरओव्हरपर्यंत लांबला तेव्हा ‘ब्रेकफास्ट’ची वेळ झाल्यासारखे वाटत होते.
एखाद्या संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यास कर्णधारावर दंड आकारला जावा, असा नियम आधीच ठरला आहे. याअंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी दंड आणि नंतरच्या गुन्ह्यासाठी निलंबनाची तरतूद आहे. पण या नियमाचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. एखादी लठ्ठ व्यक्ती वजन घटविण्यासाठी धावते आणि त्यानंतर डायट कोक पिते, असाच काहीसा हा प्रकार आहे. यावर एक तोडगा असाही असू शकेल की दोन डावांमध्ये जो २० मिनिटांचा ब्रेक दिला जातो तो कमी करून १० मिनिटांचा करण्यात यावा. पंचांनी चहापान लवकर आटोपते घ्यावे. यामुळे १० मिनिटांची सहज बचत होईल.
काहींनी मोठ्या दंडाचा प्रस्ताव दिला तर काहींनी नेट रनरेटमध्ये पेनल्टी आकारण्याचा आणि गुण कमी करण्याची सूचना केली. पण याचा विपरीत परिणाम स्पर्धेवर पडू नये. कुठलीही व्यक्ती वाढत्या स्थूलपणावर उत्कृष्ट सवयींचा उपाय शोधते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो कमी खाईल व अधिक व्यायाम करेल. या समस्येचीही सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारावी. पंच घड्याळावर नजर ठेवतात. वेळ अधिक होत आहे, असे दिसताच ते कर्णधार व गोलंदाजाला ताकीद देऊ शकतात. प्रत्येक खेळाडू याबाबत एकमेकांना सावध करू शकतात. बोलण्यात वेळ वाया घालविणे सोडावे लागेल.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये १०० चेंडूची क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. हा सामना केवळ अडीच तासात खेळविला जाईल. हा लहान प्रकार किती यशस्वी ठरतो, हे पाहावे लागेल. फलंदाज मात्र शतक ठोकता येणार का, याबाबात चिंतित असतील. तोपर्यंत चांगल्या सवयी लावून आम्ही आयपीएलला ‘फिट’ राखू शकतो.