Sandeep Sharma Ruled Out Rajasthan Royals IPL 2025: यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाला ९ पैकी फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. यामुळे तो पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. राजस्थानचे शिल्लक असलेले सर्व सामने 'करो वा मरो' पद्धतीची असणार आहेत. त्यातच त्यांच्या संघासाठी एक वाईट बातमी येत आहे. संघातील वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्या बोटाला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. यामुळे राजस्थानची गोलंदाजी कमकुवत होईल. कारण संदीप शर्मा हा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट मानला जातो.
संदीप शर्माला काय झाले?
२८ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा जखमी झाला. संदीप शर्माने गुजरात टायटन्सकडून १६ वे षटक टाकले. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर गिलने चेंडू ड्राईव्ह केला आणि संदीपने त्याच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. तरीही, त्याने गोलंदाजी सुरू ठेवली आणि चार षटकांचा कोटा पूर्ण केला. या सामन्यात त्याने ४ षटकांत ३३ धावा देत एक विकेट घेतली. पण त्याच्या बोटाची दुखापत गंभीर असल्याचे समजले. १ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी संदीप शर्मा जेव्हा टीम बसमधून उतरला, तेव्हा त्याच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली होती. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, बोटाला फ्रॅक्चर असूनही संघासाठी आपला स्पेल पूर्ण करणाऱ्या योद्ध्यासाठी टाळ्या वाजवा.
'या' हंगामात संदीपची कामगिरी
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने या हंगामात एकूण १० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९.८९ च्या इकॉनॉमीने ९ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीमध्ये त्याने आतापर्यंत १३७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८.०३ च्या सरासरीने १४६ विकेट्स घेतल्या आहेत. संदीप शर्मा हा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट असून तो २०२३ पासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे.