दरबान - दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडेन मार्कराम (१४३) याच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या डावात ९ बाद २९३ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२४ धावांची आवश्यकता आहे. पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यांना यासाठी आफ्रिकेचा १ गडी बाद करायचा आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ५ बाद १६७ धावा केल्या असून, ते ४१७ धावांच्या लक्ष्यापासून आता २५0 धावांनी पिछाडीवर आहेत. आॅस्ट्रेलियाने सकाळी आपल्या कालच्या ९ बाद २१३ या धावसंख्येवरून पुढे खेळताना दुसºया डावात २२७ धावा केल्या. चहापानाला खेळ थांबला तेव्हा मार्कराम १४३ धावा काढून बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेचे सर्वांत कमी अनुभवी फलंदाज मार्कराम आणि थेनिस डी ब्रूएन यांनी जवळपास २ तास विकेट पडू न देता यादरम्यान पाचव्या गड्यासाठी ८७ धावांची भागीदारी केली. हे दोघे स्थिरावण्याआधी दक्षिण आफ्रिकेने त्यांचे आघाडीचे ४ फलंदाज ४९ धावांतच गमावले होते. कारकिर्दीतील चौथाच कसोटी सामना खेळणारा डी ब्रुएन याने जोश हेजलवूड याच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देण्याआधी ३६ धावा केल्या. दुसºया सत्रात बाद होणारा तो एकमेव फलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेला उपाहाराआधी मोठे धक्के बसले. डीन एल्गर (९), हाशिम अमला (८), अॅबी डिव्हिलियर्स (0) आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस (४) हे दुहेरी आकडी धावा फटकावण्यात अपयशी ठरले.
मार्कराम आणि एल्गर यांनी पहिल्या गड्यासाठी २९ धावांची भागीदारी केली. एल्गरने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक टीम पेन याच्या हाती झेल दिला. आमला सलग दुसºया डावातही भोपळा न फोडता बाद होता-होता वाचला; परंतु हेजलवूडने त्याला पायचीत केले. पहिल्या डावात सर्वाधिक धावा फटकावणारा डिव्हिलियर्स धावबाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का बसला. मार्करामने आॅफस्पिनर नाथन लियोनचा चेंडू स्क्वेअरलेगला खेळला; परंतु तो डिव्हिलियर्सने धाव काढण्यासाठी सांगितल्यानंतरही तो पळाला नाही. त्यामुळे डिव्हिलियर्सला परतावे लागले; परंतु क्रीजपर्यंत पोहोचण्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या थ्रोवर लियोनने त्याला धावबाद केले. पॅट कमिन्सने त्याच्या तिसºयाच चेंडूवर डुप्लेसिसला त्रिफळाबाद केले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १६२ आणि दुसरा डाव : ९ बाद २९३. (मार्कराम १४३, थेनिस डी ब्रुएन ३६, डीकॉक खेळत आहे ८१, मॉर्केल खेळत आहे ०) मिचेल स्टार्क ४/७४, हेजलवूड २/५७. आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३५१. दुसरा डाव : २२७.