Join us  

Team India Rohit Sharma: मराठमोळ्या माजी क्रिकेटरने रोहित शर्माला दिला विशेष सल्ला; म्हणाला, "आतापासूनच तयारीला लागा..."

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धचा पहिला सामना सहज जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 12:01 PM

Open in App

Team India Rohit Sharma: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेची सुरूवात विजयाने केली. तुलनेने कमकुवत असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने २८ षटकांतच गुंडाळलं आणि सहज सामना जिंकत मालिकेत १-०ची आघाडी घेतली. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर रोहितच्या नेतृत्वाचं साऱ्यांनीच कौतुक केलं. त्याने घेतलेले ३ DRS रिव्ह्यू अचूक ठरल्याने त्याचीही चर्चा झाली. त्यातच भारताचा मराठमोळा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने रोहितला आणि टीम इंडियाला एक विशेष सल्ला दिला.

"भारतीय संघ व्यवस्थापनाने आता फलंदाजांचे क्रमांक नक्की केले पाहिजेत. कोणता फलंदाज कधी फलंदाजीस येणार हे आतापासूनच ठरवून ठेवायला हवं. जर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करणार असेल तर त्याला आतापासून ते पुढील दीड वर्षापर्यंत म्हणजे ODI World Cup 2023 पर्यंत मधल्या फळीतच खेळवलं जायला हवं. तरंच संघाचा समतोल टिकून राहिल. आतापासूनच प्रत्येक फलंदाजाच्या मनात आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता असायला हवी की नक्की कोणता खेळाडू कुठे खेळणार. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर भारताकडे संयमी पण मोठे फटके खेळू शकणार दमदार फलंदाज असायलाच हवेत", असं अतिशय स्पष्ट मत अजित आगरकरने व्यक्त केलं.

"२०२३ साली वन डे वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारतात खेळला जाणार आहे. भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणं खूपच कठीण आहे. पण मला असं वाटतं की रोहित काही काळ दुखापतग्रस्त होता. त्याला बरीच विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून तो ताजातवाना असेल आणि नव्या पद्धतींचा नक्कीच विचार करेल. वन डे मालिकांमधील भारताची कामगिरी पाहता भारतीय संघ हा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाईल हे नक्कीच", असंही अजित आगरकर म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुल
Open in App