आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा जगभरातील विविध लीगमध्ये खेळला. कॅनडात झालेल्या लीगनंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते T10 लीगकडे.... युवीनं या लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यापासूनच त्याचे चाहते खूश होते. युवीला या लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आली नसली तरी त्याच्या संघानं जेतेपद पटकावले. ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली मराठा अरेबियन्स संघानं जेतेपद पटकावलं.
डेक्कन ग्लॅडीएटर्स आणि मराठा अरेबियन्स यांच्यात अंतिम सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना ग्लॅडीएटर्सला 10 षटकांत 8 बाद 87 धावा केल्या. आघाडीच्या फलंदाज अपयशी ठरल्यानंतर भानुका राजपक्ष ( 23) आणि आसीफ खान ( 25*) यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
ड्वेन ब्राव्होनं 16 धावांत 2 विकेट्स घेतल्या. मराठा अरेबियन्सकडून सलामीवीर चॅडवीक वॉल्टनने 26 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 51 धावांची वादळी खेळी करताना संघाचा विजय पक्का केला. मराठा अरेबियन्सने हा सामना 7.2 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केला.
या स्पर्धेत अरेबियन्सच्या ख्रिस लीननं 8 डावांत 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. युवीला 4 डावांमध्ये 44 धावा करता आल्या. गोलंदाजांत कलंदर्स संघाच्या जॉर्ज गार्टननं सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या.