Join us  

IPL 2019 : बऱ्याच वर्षांपासून मुंबई इंडियन्समधील संधीची प्रतीक्षा होती - सिध्देश लाड

पहिल्या सामन्यासाठी मी जितका उत्साहीत होतो, तितकाच नर्व्हसही होतो, असे मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि मुंबई रणजी संघाचा कर्णधार सिध्देश लाड याने लोकमतशी बोलताना सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 5:01 PM

Open in App

रोहित नाईक, मुंबई : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करतानाचा अनुभव फार वेगळा नव्हता. गेल्या चार वर्षांपासून मी मुंबई इंडियन्ससोबत असल्याने हे वातावरण माझ्यासाठी नवे नव्हते. पण, जेव्हा मी सामना खेळणार असल्याचे कळाले आणि मला आनंद झाला. कारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी या संधीच्या प्रतिक्षेत होतो. बऱ्याच वर्षांनंतर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचे माझे स्वप्न साकार होणार होते. या सामन्यासाठी मी जितका उत्साहीत होतो, तितकाच नर्व्हसही होतो, असे मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि मुंबई रणजी संघाचा कर्णधार सिध्देश लाड याने लोकमतशी बोलताना सांगितले.मुंबई व आसपासच्या विभागातील युवा खेळाडूंसाठी हक्काची स्पर्धा असलेल्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या २९व्या सत्राचे शनिवारी माटुंगा येथील दडकर मैदानात सिध्देश लाडच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्याने लोकमतशी संवाद साधला. २०१५ सालापासून मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या सिध्देशला यंदाच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी सिध्देशची संघात निवड झाली होती. मात्र या सामन्याआधी पुरेसा सराव करता न आल्याची माहिती त्याने दिली. 

सिध्देश म्हणाला, "गेल्या चार वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघासोबत जुळलेलो असल्याने हे वातावरण माझ्यासाठी नवे नव्हते. सराव सत्रादरम्यान रोहित दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी मला संधी मिळाल्याची माहिती रात्री कळाली. जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी सरावातून ब्रेक घेतलेला. त्यामुळे मी जितका उत्साहीत होतो, तितकाच नर्व्हसही होतो.  तरी पंजाबविरुद्ध पदार्पण करताना थोडे वेगळे वाटलेच. त्यादिवशी मिळालेल्या संधीने मी आनंदी होतो.  रोहितच्या हस्ते संघाची कॅप घेतानाचा अनुभव वेगळाच होता. गेल्या अनेक वर्षापासून मी या क्षणासाठी थांबलेलो."रणजी स्पर्धेत गेल्या दोन वर्षात मुंबईला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नाही. यावर मुंबई संघाचा कर्णधार सिध्देश म्हणाला की, " मागचे मोसम मुंबईसाठी चांगले गेले नाही. पण आता प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, सर्व खेळाडू अशी सर्व टीम एकत्र बसून आम्ही पुढच्या लक्ष्यावर चर्चा करु. यंदा नक्कीच निकाल सकारात्मक लागेल. फक्त यंदाच्या वर्षासाठी नाही, तर पुढील पाच वर्षाच्या वाटचालीवर आत्तापासून विचार व्हायला पाहिजे असे वाटते."रणजी स्पर्धेत नेहमी संघाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढणाºया सिध्देशला मुंबईचा संकटमोचक म्हटले जाते. याविषयी त्याने म्हटले की, "संघाचा तारणहार, संकटमोचक अशा नावाने म्हटले जाते त्याचे काहीसे दडपण असतेच. खेळताना एक फलंदाज म्हणून थोडा दबाव असतोच, ते मी नाकारणार नाही. यातूनच माझा खेळ बहरला आहे. मला कोणत्या नावाने ओळखल जात याचा मी विचार करत नाही. जे माझी बलस्थाने आहेत, त्यावरच लक्ष केंद्रीत करत मी माझा खेळ करतो. मी नेहमी संघाच्या विजयासाठी खेळतो आणि वैयक्तिक खेळासाठी मी कधीही खेळलेलो नाही. यामुळेच जेव्हा संघाला गरज असते तेव्हा मी माझे योगदान देतो." "आयपीएलमध्ये ग्लॅमर आणि खेळ याचा ताळमेळ ठेवावाच लागतो.  पण अशा वातावरणामध्ये मी खेळावर परिणाम होऊ देत नाही. जस मी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळतो, तसाच खेळ मी इथेही करण्यावर भर देतो," असेही सिध्देशने म्हटले.-----------------------

आजचा दिवस माझ्यासाठी खूप वेगळाच आहे. जेव्हा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या सिध्देशने आपल्या भाषणात माझा उल्लेख केला तेव्हा माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शिवाय यावेळी त्याला भारताचा स्टीव्ह वॉ अशी पदवी दिली, ते पाहून खूप भारावलो. त्याने आयपीएल पदार्पण केले, तो माझ्यासाठी मोठा दिवस होता. पाच वर्ष थांबल्यानंतर त्याला संधी मिळाली होती. त्याने कधीही हार मानली नाही हे महत्त्वाचे. - दिनेश लाड, सिध्देशचे वडिल आणि प्रशिक्षक

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल