Join us  

"मनोहर विरोधात काम करत होते; बीसीसीआयचे किती नुकसान केले याचे आकलन करावे"

मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले असून जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटचे महत्व कमी करण्यासाठी मनोहर हेच जबाबदार असल्याचा हल्लाबोल श्रीनिवासन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 11:40 PM

Open in App

नवी दिल्ली : आयसीसी चेअरमनपदावर असताना शशांक मनोहर बीसीसीआयच्या विरोधात काम करीत होते, असा आरोप एन. श्रीनिवासन यांनी केला आहे.

मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले असून जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटचे महत्व कमी करण्यासाठी मनोहर हेच जबाबदार असल्याचा हल्लाबोल श्रीनिवासन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत केला. ‘ज्या क्षणी बीसीसीआयमध्ये नेतृत्वबदल झाला त्यावेळपासून आता आपल्याला भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही हे मनोहर यांनी ओळखले. आपल्याला पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळणार नाही, हे समजल्यानंतर मनोहर यांनी बहाणा करत पळ काढणे पसंत केले. बीसीसीआयशी संबंधित सर्व अधिकारी त्यांच्या जाण्यामुळे आनंदी असतील. जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व कमी करण्यामध्ये मनोहर यांचा मोठा वाटा आहे,’ असे श्रीनिवासन म्हणाले.

आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी सौरव गांगुली, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोडार्चे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्ह्स आणि विंडीज क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख डेव्ह कॅमरुन यांची नावे घेत आहेत. दरम्यान, राजकोट येथून बोलताना ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदावरून कालच पायउतार झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेटला कशाप्रकारे नुकसान पोहचविले याचे आकलन त्यांनी निश्चित करायला हवे,’असे आवाहन करीत बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी त्यांच्यावर टीका केली.मनोहर यांनी आयसीसी चेअरमनपदाचे दोन वर्षांचे दोन कार्यकाळ बुधवारी पूर्ण केले. तिसऱ्या कार्यकाळासाठी आपल्याला साथ मिळणे कठीण जाईल याची जाणीव होताच ते पायउतार झाले. क्रिकेटमधील बिग थ्री मॉडेल रद्द करण्यात मनोहर यांची मोठी भूमिका होती. या मॉडेलनुसार भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डाला कमाईचा मोठा वाटा मिळत असे.

शाह म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या विकासासाठी मनोहर यांनी जे काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटवर किती अन्याय झाला, याचे त्यांनी एकदा तरी सिंहावलोकन करावे. बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने ते आयसीसीत गेले. त्यानंतर आयसीसी प्रमुख या नात्याने आपल्याच बोर्डाला कशी वागणूक दिली हे एकदा तपासून पहावे.’ आयसीसीतील त्यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपदेखील शाह यांनी केला. ‘बीसीसीआयच्या सध्याच्या नेतृत्वामुळे मात्र आयसीसीत भक्कम, लाभदायी आणि रचनात्मक प्रतिनिधित्व मिळेल, असे मत व्यक्त करीत शाह पुढे म्हणाले, ‘मागच्या काही वर्षांत बीसीसीआयला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आयसीसीने संधीचा लाभ घेत भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयला कोंडीत पकडून मोठे नुकसान केले. तथापि सौरव गांगुलीच्या रूपात सध्याचे नेतृत्व बीसीसीआयला पुन्हा वैभवाचे स्वरूप आणून देईल यात शंका नाही,’असे शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :आयसीसीबीसीसीआय