कराची : पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताविरुद्ध पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद होणाऱ्या अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याच्यावर टीका केली आहे. या अनुभवी खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे हे त्याने लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी म्हटले. ३३ वर्षीय मलिकने या वर्षाच्या सुरुवातीलाच विश्वचषकानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असून, पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात होणाºया टी २० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले होते.
मलिकने विश्वचषकाच्या तीन सामन्यांत फक्त आठ धावाच केल्या आहेत. माजी कसोटीपटू इकबाल कासिम म्हणाला, ‘त्याने स्वत:च विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता त्याला अन्य चार सामन्यांत खेळण्याची संधी मिळेल, असे मला वाटत नाही.’ मलिकने ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १११ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.