Join us  

द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मलिक, मोहसिन, कार्तिक दावेदार; आज संघ जाहीर होणार

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्थानिक टी-२० मालिकेसाठी आज रविवारी भारतीय संघाची निवड होणार आहे. युवा स्टार वेगवान गोलंदाज उमरान ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 9:30 AM

Open in App

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्थानिक टी-२० मालिकेसाठी आज रविवारी भारतीय संघाची निवड होणार आहे. युवा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक, आणि मोहसिन खान यांची आयपीएलमधील कामगिरी पाहता त्यांच्यावर निवडकर्ते विशेष लक्ष देतील, असे मानले जात आहे. अनुभवी शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांचेदेखील संघात पुनरागमन अपेक्षित आहे.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने लीगमध्ये चांगल्या कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय संघाची दारे ठोठावली.  ९ जूनपासून पाच सामन्यांची मालिका खेळली जाईल.  मागच्या टी-२० विश्वचषकापासून हार्दिक भारतासाठी खेळलेला नाही. आता नियमितपणे गोलंदाजी करीत असल्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो.दोन महिने आयपीएल खेळल्यामुळे सर्व प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्याची बोर्डाची योजना आहे. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. हे खेळाडू १५ जूनआधी थेट इंग्लंडकडे रवाना होतील. 

जूनअखेरीस आयर्लंडमध्ये होणाऱ्या दोन टी-२० सामन्यासाठी असाच संघ निवडला जाईल, अशी शक्यता आहे.  असे झाल्यास नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक किंवा धवन यांच्याकडे सोपविली जाईल. यंदा आयपीएलमध्ये उमरानसारखा वेग असलेला गोलंदाज गवसला. मोहसिन खानदेखील टिच्चून मारा करतो. याशिवाय अर्शदीपसिंह अचूक याॅर्कर टाकू शकतो. फलंदाजीत तिलक वर्मा याने लक्षवेधी कामगिरी केली.  दीपक हुड्डा आणि व्यंकटेश अय्यर हे मधल्या फळीत स्वत:चे स्थान टिकवू शकतील का, हे पाहावे लागेल.

दिनेश कार्तिकने आरसीबीसाठी फिनिशर्सची भूमिका बजावली.  त्याचा दावादेखील भक्कम ठरतो.  राहुल तेवतिया यालादेखील या स्थानासाठी संधी दिली जाऊ शकते.  युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा फॉर्मदेखील नजरेआड करता येणार नाही.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिकाशिखर धवन
Open in App