Join us  

युवांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे

दिलीप वेंगसरकर; अजिंक्य रहाणेने आघाडीवर राहून नेतृत्व केले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 2:17 AM

Open in App

रोहित नाईक

मुंबई : ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अखेरच्या निर्णायक कसोटी सामन्यासाठी भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहे. मात्र यामुळे आता काही युवा खेळाडूंना संधी मिळेल आणि या संधीचे त्यांनी सोने करुन संघातील आपले स्थान अधिक पक्के करावे,’  असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असून अखेरच्या कसोटी सामन्याला १५ जानेवारीपासून सुरुवात होईल. यानिमित्ताने वेंगसरकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.   ‘पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर टीम इंडियाने जी भरारी घेतली, ती उल्लेखनीय आहे. अजिंक्य रहाणेने शानदार नेतृत्त्व केले. त्याने शतक ठोकत संघाचा आत्मविश्वास वाढवला. कोणताही कर्णधार जेव्हा शतक ठोकतो, तेव्हा तो पुढे राहून नेतृत्त्व करतो आणि हेच रहाणेने केले. यामुळे संघाचेही मनोबल उंचावले. कर्णधार म्हणून रहाणेने स्वत:ला सिद्ध केले आहे.’ युवा खेळाडूंबाबत वेंगसरकर म्हणाले की, ‘तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीयांचा झुंजार खेळ जबरदस्त होता. विहारी, अश्विन आणि पंत यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आता अनेक खेळाडू अनफिट आहेत. पण माझ्यामते, जे दुखापतग्रस्त आहेत, त्यांचा अधिक विचार न करता अंतिम संघात खेळणाऱ्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. युवा खेळाडूंचे मनोबल उंचावण्याची आवश्यकता असून युवांनी मिळालेली संधी साधावी.’-----------------------

‘पंचांनी स्मिथला रोखले पाहिजे होते’

भारताच्या ॠषभ पंतच्या बँटिंग गार्डचे निशान बुटाने पुसताना ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ स्टम्प कॅमेरात कैद झाला. यामुळे त्याच्यावर मोठी टीकाही झाली. मात्र वेंगसरकर यांनी स्मिथने मुद्दामहून हे कृत्य केले नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, ‘स्मिथने गार्ड पुसण्याचा प्रयत्न केल्याचे मला वाटत नाही. त्याने नेहमीप्रमाणे शॅडो प्रॅक्टिसिंग केली. मात्र, हे होत असताना पंचांनी लक्ष देणे गरजेचे होते. पंचांनी त्याला थांबवून ताकित द्यायला पाहिजे होती.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ