Join us  

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीबाबत घेतला मोठा निर्णय?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:37 PM

Open in App

लंडन - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. पण भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला असून, या विश्वचषक स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून  निवृत्ती होणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा शेवटचा सामना हा धोनीचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरू शकतो. 

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत धोनीचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येत असला तरी त्याला फलंदाजीमध्ये अपेक्षित चमक दाखवता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत केलेली अर्धशतकी खेळी ही त्याची या स्पर्धेतील एकमेव मोठी खेळी ठरली आहे. तसेच शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमवण्यात धोनी अपयशी ठरत असल्याने माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींकडूनही त्याच्या बचावात्मक खेळावर टीका होत आहे. दरम्यान, मंगळवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीतही धोनीने 33 चेंडूत 35 धावांची सावध खेळी केली.  या लढतीत रोहित शर्माने शानदार शतक तर लोकेश राहुलने 77 धावांची खेळी करून संघाला 180 धावांची सलामी दिली. त्यानंतर ऋषभ पंत याने 48 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करून दिली. मात्र शेवटच्या षटकांमध्ये धोनीने पुन्हा एकदा सावध खेळ केला होता.. त्याने 33 चेंडून 35 धावांची बचावात्मक खेळी केल्याने भारताचे सव्वा तीनशेहून अधिक धावा फटकावण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. धोनीच्या या कासवछाप खेळीनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेक क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या अतिबचावात्मक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

 पण धोनीवर सातत्याने टीका होत असताना, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर माहीच्या मदतीला धावला आहे. , बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तेंडुलकर म्हणाला,''मला वाटतं ती महत्त्वाची खेळी होती आणि संघाला जशा खेळीची गरज होती, धोनी तसाच खेळला. तो 50 षटकं खेळपट्टीवर टिकून राहिला, तर इतर फलंदाजांवरील दडपण कमी होतं. त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि तो तेच करतोय. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.'' 

रोहित, बुमराहचं कौतुक, तर क्रिकेटप्रेमींसाठी धोनी पुन्हा ठरला व्हिलन धोनीच्या  कासवछाप खेळीनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेक क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या अतिबचावात्मक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरीस गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून भारतीय संघाला विजय मिळवता आला.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघवर्ल्ड कप 2019