मुंबई: इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकत भारतानं टी-20 मालिका 2-1 नं जिंकली. भारतानं 7 गडी आणि 8 चेंडू राखून इंग्लंडचा पराभव केला. या विजयासोबतच भारतानं सलग सहा टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान होतं. सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं या मोठ्या आव्हानाचा सहज पाठलाग केला.
भारताच्या या विजयात रोहित शर्मासह हार्दिक पांड्यानंदेखील महत्त्वपूर्ण कामगिरी केली. हार्दिक पांड्यानं इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. चौदाव्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीनं घेतलेला झेल 25 लाख रुपयांना पडला. इंग्लंडचा संघ फलंदाजी करताना हार्दिक पांड्यानं 14 वं षटक टाकलं. यावेळी प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इयन मॉर्गन फलंदाजी करत होता. त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच जागेवर उंच उडाला. धोनीनं पुढे येत हा चेंडू पकडला. मात्र हा झेल घेताना धोनीचा पाय लागल्यानं एलईडी स्टम्प तुटला. धोनीकडून अनवधानानं तुटलेल्या स्टम्पची किंमत जवळपास 40 हजार डॉलर म्हणजेच 25 लाख रुपये आहे.
मालिका विजयाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यात यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीनं दोन विश्व विक्रम केले. धोनीनं या सामन्यात पाच झेल घेतले. एकाच टी-20 सामन्यात पाच फलंदाजांना झेलबाद करण्याची कामगिरी याआधी कोणत्याही यष्टिरक्षकाला जमलेली नाही. याशिवाय टी-20 सामन्यांमध्ये 50 फलंदाजांना झेलबाद करण्याचा विक्रमदेखील धोनीच्या नावावर जमा झाला आहे. धोनीनं 93 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.