Join us

महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय, माया सोनवणेचे ४ बळी

औरंगाबाद : नाशिकची लेगस्पिनर माया सोनवणे हिच्या जादुई फिरकी गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने एमजीएम मैदानावर रविवारी झालेल्या १९ वर्षांखालील पश्चिम विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघावर ८ विकेटनी दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 22:36 IST

Open in App

औरंगाबाद : नाशिकची लेगस्पिनर माया सोनवणे हिच्या जादुई फिरकी गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने एमजीएम मैदानावर रविवारी झालेल्या १९ वर्षांखालील पश्चिम विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघावर ८ विकेटनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. याआधी शनिवारी महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर मात केली होती.गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. धावफलकावर अवघ्या १३ धावा असताना त्यांनी सलामीवीर आय. पटेल (२) आणि एच. पटेल (०) यांना गमावले. आय.एम. पटेल हिला उत्कर्षा पवारने बाद केले, तर एच. पटेल धावबाद झाली. त्यानंतर ए. वाधवा आणि बी.एस. गोपलानी यांनी तिस-या गड्यासाठी ३४ धावांची छोटीशी भागीदारी करताना पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु सौराष्ट्र संघाविरुद्ध प्रभावी गोलंदाजी करणा-या माया सोनवणे हिने पुन्हा एकदा जबरदस्त स्पेल टाकत ही जम बसलेली जोडी वाधवा हिला तंबूत धाडत फोडली. त्यानंतर माया सोनवणेच्या सुरेख गोलंदाजीसमोर गुजरातचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही आणि त्यांचा संघ ४९.१ षटकांत ८४ धावांत गारद झाला.गुजरातकडून ए.एन. वाधवा (३६) आणि बी.एस. गोपलानी (१८) यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडी धावा फटकावू शकला नाही. महाराष्ट्राकडून नाशिकच्या माया सोनवणे हिने ९ षटकांत फक्त १८ धावा देत ४ गडी बाद केले. तिला निकिता आगे हिने ८ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. उत्कर्षा पवार, आदिती गायकवाड, रमा कासंदे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. त्यानंतर गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणा-या माया सोनवणे हिने फलंदाजीतही चमक दाखवली. तिने प्रियंका घोडकेच्या साथीने सलामीला ६.६ षटकांत ३८ आणि त्यानंतर ऋतुजा देशमुख हिच्या साथीने दुस-या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला २६.३ षटकांत विजय मिळवून दिला. महाराष्ट्राने विजयी लक्ष्य २ गडी गमावून ८७ धावा करीत पूर्ण केले. महाराष्ट्राकडून माया सोनवणे हिने सर्वाधिक ८५ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. ऋतुजा देशमुखने ३ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. प्रियंका घोडकेने १३ चेंडूंत ३ चौकारांसह १३ धावा केल्या.संक्षिप्त धावफलकगुजरात : ४९.१ षटकांत सर्वबाद ८४. (ए.एन. वाधवा ३६, बी.एस. गोपलानी १८. माया सोनवणे ४/१८, निकिता आगे २/८, उत्कर्षा पवार १/१६, आदिती गायकवाड १/१३, रमाकासंदे १/१५)महाराष्ट्र : २६.३ षटकांत २ बाद ८७.(माया सोनवणे नाबाद ३६, ऋतुजा देशमुख २३, प्रियंका घोडके १४. एच. सोलंकी २/२0).