Join us

IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई

IPL Betting MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा IPL मधील सट्टेबाजी घोटाळ्याची संबंध काय... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:51 IST

Open in App

IPL Betting MS Dhoni : IPLच्या सट्टेबाजी घोटाळ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे नाव घेत त्याच्या प्रतिमेला धक्का लावल्याप्रकरणी आता खटला चालवला जाणार आहे. महेंद्रसिंग धोनीकडून या प्रकरणी १०० कोटींच्या मानहानीचा दावा करण्यात आला असून मद्रास उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता साक्षीदारांची साक्ष नोंद करून घेण्यासाठी अडव्होकेट कमिश्नरची नियुक्ती केली आहे. धोनीच्या वकिलाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची नोंद घेत, न्यायमूर्ती सी.व्ही. कार्तिकेयन यांनी सोमवारी २० ऑक्टोबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान चेन्नईमध्ये साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

अडव्होकेट कमिश्नर कोण निवडणार?

अडव्होकेट कमिश्नरची निवड न्यायालयाकडे उपलब्ध असलेल्या यादीतून केली जाईल. त्यांनी या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात धोनीचे नाव घेऊन प्रतिमा मलिन केल्याबद्दल धोनीने २०१४ मध्ये झी मीडिया कॉर्पोरेशन, पत्रकार सुधीर चौधरी, निवृत्त पोलिस अधिकारी जी. संपत कुमार आणि न्यूज नेशन नेटवर्क यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. अडव्होकेट कमिश्नरची नियुक्ती करताना, न्यायमूर्ती कार्तिकेयन यांनी त्यांना सर्व संबंधित पक्षांना आणि त्यांच्या वकिलांना सोयीस्कर वेळी चेन्नईमध्ये जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणात अडव्होकेट कमिश्नरची निवड का?

मुख्य चौकशी आणि उलटतपासणीसाठी धोनीची वैयक्तिक उपस्थिती इतरांवर परिणाम करू शकली असती, कारण तो एक सेलिब्रिटी आहे. त्यामुळे अडव्होकेट कमिश्नरची नियुक्ती करण्यात आली आहे. धोनीने वरिष्ठ वकील पी.आर. रमन यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. त्याने २०१४ पासून प्रलंबित असलेल्या मानहानीच्या खटल्याचा पाठपुरावा करण्याची तयारीही दर्शविली.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीक्रिकेट सट्टेबाजीआयपीएल २०२४उच्च न्यायालय