भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा सामान्यांच्या मदतीला मैदानावर उतरला आहे. वीरुनं त्याच्या फाऊंडेशन व अन्य NGOच्या मदतीनं दिल्लीत ऑक्सिजन संच बँक तयार केली आहे आणि गरजूंना ते मदत करत आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या वीरूनं रविवारी एक फोटो पोस्ट केला. त्यात ऑक्सिजन मास्क तोंडावर लावूनही आई तिच्या कुटुंबीयांसाठी जेवण बनवताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना वीरू भावनिक झालेला पाहायला मिळाला. त्यानं या आईबद्दल कोणाला माहीत असल्यास त्वरीत संपर्क साधा, असं आवाहन केलं. ( Maa Maa hoti hai. Tears seeing this)
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेलाही हतबल केलं आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा... रुग्णांना उपचारासाठी बेड्स मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर हे सर्व मिळेलच याची गॅरंटी नाही. फक्त सामान्य व्यक्तींनाच नव्हे तर क्रिकेटपटूंनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. सुरेश रैनानं काही दिवसांपूर्वी त्याच्या काकीसाठी ऑक्सिजन सिलेंडरसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली होती, हरभजन सिंग यानंही त्याच्या मित्रासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मागितले होते. या दोघांनाही बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं ( Sonu Sood) मदत केली.
भारतात ऑक्सिजन संचाच्या तुटवड्याची समस्या गंभीर होत चालली आहे आणि त्यासाठी सरकारपासून प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करत आहे. सेहवाग यानंही मदतीचा हात पुढे केला आहे. सेहवागनं दिल्लीत एक ऑक्सिजन संचाची बँक तयार केली आहे आणि त्या माध्यमातून तो गरजूंना मोफत सुविधा पुरवत आहे.
सेहवाग फाऊंडेशन दिल्लीतील गरजू व कोरोना रुग्णांना घरचं मोफत जेवण देत आहेत. शिवाय त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्याचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.