मुंबईमध्ये आज क्रिकेटच्या मैदानात एक खास असं दृश्य दिसलं. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध पारसी जिमखाना येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी ऋषी सुनक यांनी गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करत अखेरपर्यंत आपली विकेट राखून ठेवली. या खेळाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, मुंबईमधील माझा कुठलाही दौरा हा टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय पूर्ण होत नाही.
पारशी जिमखाना क्लबच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना ऋषी सुनक म्हणाले की, इथे तुम्हा सर्वांदरम्यान असणं हा खूप अदभूत अनुभव आहे. हे एक अत्यंत असामान्य असं यश आहे. इथे बराचसा इतिहास आणि भविष्यातील खूप काही रोमांचक गोष्टी इथे पाहायला मिळतील. खास बाब म्हणजे आज सकाळी मी स्वत:ला अनेकदा बाद होण्यापासून वाचवले.
मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या पारशी जिमखान्याची स्थापना २५ फेब्रुवारी १८८५ रोजी करण्यात आली होती. सर जमशेदजी जीजीभॉय हे याचे पहिले अध्यक्ष होते. १८८७ मध्ये हा क्लब मरीन ड्राइव्ह येथे स्थलांतरिर करण्यात आला होता.