LSG vs DC Sanjiv Goenka Reaction On Animated Chat With Rishabh Pant : आयपीएल २०२६ च्या हंगामातील घरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्याच सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर माफक १४२ धावांचे टार्गेट पार करत दिल्लीच्या संघाने विजयी सलामी दिली. या पराभवानंतर लखनौच्या ताफ्यात पुन्हा एकदा जुन्या गोष्टींना उजाळा देणारे चित्र पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG च्या पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका चर्चेत
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर लखनौ फ्रँचायझी संघाचे मालक संजीव गोएंका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या लढतीनंतर ते कर्णधार रिषभ पंतसह कोच जस्टीन लँगर यांच्यासोबत नाराजीच्या स्वरात चर्चा करताना दिसले. यावरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. संघ मालकाने कर्णधार आणि प्रशिक्षकावर संताप व्यक्त केल्याची चर्चा रंगत असताना मैदानातील जे घडलं त्यासंदर्भात खुद्द संजीव गोएंका यांनी सूचक ट्विट केले आहे. अशा क्षणातूनच काही तरी मोठं घडत असं मत त्यांनी मांडले आहे.
IPL 2026: ऋषभ पंत आणि संजीव गोयंका यांच्यात नेमकं काय घडलं? मैदानातील 'तो' व्हिडीओ समोर!
LSG संघ मालकाने रिषभ पंत अन् संघासंदर्भात व्यक्त केली मनातील भावना
संजीव गोएंका यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मैदानात जे घडलं त्यामागची गोष्ट सांगितली आहे. "हा हंगाम खूप मोठा आहे आणि अशा क्षणांमधूनच काहीतरी अर्थपूर्ण घडतं. मला आमच्या कर्णधारावर आणि संपूर्ण संघावर पूर्ण विश्वास आहे. ते या परिस्थितीतून अधिक ताकदीने पुनरागमन करतील. संघाला प्रोत्साहन देणाऱ्या चांहत्यांचे मनापासून आभार. आम्ही नक्कीच कमबॅक करू." त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
रिषभ पंत, जस्टिन लॅंगर आणि संजीव गोएंका यांच्यातील गंभीर चर्चा
लखनौच्या पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका मैदानात जस्टीन लँगर आणि रिषभ पंतसोबत चर्चा करताना दिसले. त्यांचा आक्रमक अंदाज ते कर्णधार प्रशिक्षकावर रागवाल्याचे चित्र दाखवणारे होते. याआधी KL राहुलसोबत झालं ती गोष्ट गत हंगामातही पंतसोबत घडली होती. आता तेच पुन्हा घडताना दिसत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
२०२४ मध्ये केएल राहुलसोबतही झाला होता वाद
आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात लोकेश राहुल आणि संजीव गोएंका यांच्यातील वादाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांनी KL राहुलला भरमैदानात झापले होते. KL राहुलनं ते सर्व शांतपणे ऐकलं. पण त्यानंतर त्याने संघ सोडून दिल्ली कॅपिटल्सचा रस्ता धरला. त्याच संघातून आलेला पंत आता तेच भोगतो आहे.