Join us  

आयपीएलकडे विश्वचषकाची तयारी म्हणून पाहावे

- अयाझ मेमनकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा रद्दही कराव्या लागल्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:49 AM

Open in App

- अयाझ मेमन

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा रद्दही कराव्या लागल्या आहेत. याचा फटका इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लाही बसला आहे. आंतरराष्टÑीय क्रिकेट वेळापत्रकात आयपीएलचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होऊ नये, असे अनेकांना वाटते.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनचेही हेच मत आहे. त्याच्या मते आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र त्यानंतही ही स्पर्धा होऊ शकेल की नाही याबाबत शंका आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा रद्द न करता ती अगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून खेळवली जावी. या स्पर्धेचा कालावधी कमी करून यात जगभरातील क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात यावा. या आयपीएलचे आयोजन सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये करण्यात यावे. या प्रस्तावावर मायकल वॉन याने मतेही मागवली आहेत.

सध्या सर्व खेळाडू घरातच आहेत. त्यामुळे अगामी विश्वचषक स्पर्धेचा सराव म्हणूनही आयपीएलकडे पाहता येईल. अनेक खेळाडूंना यातून सराव करता येईल. त्यामुळे ही स्पर्धा रद्द न करता नवीन वेळापत्रक आखून कमी कालावधीची ही स्पर्धा घेता येईल. असे वॉन याने म्हटले आहे. वॉनचा हा विचार सर्वांनाच पसंत पडेल असे नाही, मात्र नवा प्रयोग म्हणून याकडे नक्की पाहता येईल.

याबरोबरच काही जणांनी आणखी एक प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आॅस्ट्रेलियात या वर्षी होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धाच रद्द करावी. कारण आॅस्ट्रेलियात सहा महिन्याचा लॉकआऊट जाहीर केला आहे. त्यामुळे जे संघ स्पर्धेसाठी जातील त्या सर्वांना १४ दिवस विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. त्याच बरोबर प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा का नाही यासह अन्य बाबींमुळे अनेक समस्या निर्माण होतील. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेऐवजी आयपीएलच खेळवले जावे. त्या मोबदल्यात आॅस्ट्रेलियाला २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद देण्यात यावे.

मात्र या गोष्टींसाठी क्रिकेट आॅस्ट्रेलिया व आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) तयार होतील का हा प्रश्न आहे. आयसीसीच्या राजकारणात भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड हे नेहमीच एकत्र असतात. जर आॅस्ट्रेलियासमवेतची कसोटी मालिका खेळणार असल्याचा विश्वास भारताने दिला तर आॅस्ट्रेलिया कदाचित तयार होईल. इंग्लंडचा थेट फायदा होणार नसला तरी त्यांच्या हंड्रेड या मालिकेला फायदा होऊ शकेल.

या प्रस्तावासाठी आयसीसी तयार होणार नाही. मात्र कोविड १९ मूळ या विश्वचषक स्पर्धेला कोणी प्रेक्षक येणार नसतील तर या स्पर्धेतील लोकांची रुची कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयसीसीला मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट मंडळांनी जर आयसीसीला उत्पन्नाबाबत काही ठोस प्रस्ताव दिला तर आयसीसी तयार होऊ शकते. मात्र या सर्व शक्यता आहेत. कोरोना विषाणूचे संकट जर लवकरात लवकर टळले तरच हे अंमलात येऊ शकते अन्यथा आपल्या हाती काही असणार नाही.

टॅग्स :आयपीएल 2020भारत