Join us  

लोकेश राहुल खेळणार सलामीला; शुभमन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो

२७ ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी राहुलसाठी झिम्बाब्वे दौरा रंगीत तालीम ठरेल. आशिया चषकमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल सलामीला खेळणार असल्याने त्यादृष्टीने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीला खेळविण्यात येईल.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:26 AM

Open in App

नवी दिल्ली : आगामी झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे कर्णधारपद भूषविणारा लोकेश राहुल अनुभवी शिखर धवनसह डावाची सुरुवात करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यात सलामीला खेळून चमकदार कामगिरी केलेल्या शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. २७ ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी राहुलसाठी झिम्बाब्वे दौरा रंगीत तालीम ठरेल. आशिया चषकमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल सलामीला खेळणार असल्याने त्यादृष्टीने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीला खेळविण्यात येईल.  विंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत गिलने शानदार फलंदाजी करत ६४, ४३ व नाबाद ९८ धावांची खेळी केली. या जोरावर तो मालिकावीर ठरला होता. त्यामुळे राहुल शुभमनला सलामीवीर म्हणून कायम ठेवणार की स्वत: सलामीला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर भारताचे माजी कसोटी सलामीवीर व माजी राष्ट्रीय निवडकर्ते देवांग गांधी म्हणाले की, ‘भारतीय संघ व्यवस्थापनाने गिलला चांगल्या प्रकारे अजमावून पाहिले. त्याने विंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी केली. पण  मला असे वाटते की, खेळाडूंना विविध क्रमांकावर संधी देऊन त्यांना प्रत्येक जबाबदारीसाठी तयार करावे. त्यामुळे या मालिकेत गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे. तिसरे स्थान फलंदाजीसाठी अत्यंत योग्य आहे. गिलला कदाचित दुसऱ्याच चेंडूवरही मैदानात यावे लागू शकते.’ 

सलामीला बढतीगेल्या वर्षी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून राहुलकडे मधल्या फळीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर राहुलने स्वत:ला सलामीवीर म्हणून बढती दिली. पण गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेत रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघेही संघात असताना राहुलला पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळावे लागले होते.

टॅग्स :झिम्बाब्वेभारत
Open in App