Join us

कॉफी विथ करण कार्यक्रमाबाबत लोकेश राहुलने केली 'ही' कमेंट

या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर आयुष्यात काय घडले आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल राहुलने आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:28 IST

Open in App

मुंबई : कॉफी विथ करण या कार्यक्रमात लोकेश राहुलने अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भारतीय संघातून त्याची हकालपट्टीही करण्यात आली होती. आता या कार्यक्रमावर राहुलने एक कमेंट केली आहे. या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर आयुष्यात काय घडले आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल राहुलने आपले मत व्यक्त केले आहे.

राहुल म्हणाला की, " कॉफी विथ करण या कार्यक्रमानंतरचा काळ माझ्यासाठी फारच कठिण होता. प्रत्येक व्यक्तीला, खेळाडूला कठिण काळातून जावे लागते. पण यावेळी मी ठरवले होते की, आता फक्त आणि फक्त खेळावरच लक्ष केंद्रीत करायचे. प्रत्येक वेळी नेमके काय करायचे हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे. " 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या अर्धशतकामुळे भारताला 126 धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही राहुलचे अर्धशतक फक्त तीन धावांन हुकले होते. या कामगिरीनंतर राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे म्हटले जात आहे. पण एका दिग्गज फलंदाजाने राहुलला मार्गदर्शन केल्यानंतर हा बदल पाहायला मिळाला आहे.

या कार्यक्रमानंतर तुझ्यामध्ये नेमका काय बदल झाला, असे विचारल्यावर राहुल म्हणाला की, " या घटनेनंतर मी फार नम्रपणे वागायला लागलो आहे. मला देशाकडून खेळायला मिळते हे माझे सौभाग्य आहे. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे." 

भरपूर संधी मिळूनही धावांचा पडलेला दुष्काळ, कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील वक्तव्य या साऱ्या गोष्टींमुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल निराशेच्या गर्तेत अडकला होता. पण यामधून त्याला भारताच्या एका महान फलंदाजाने बाहेर काढले. या महान फलंदाजाच्या टिप्समुळे राहुलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावा बरसल्या. या यशानंतर राहुलनेच आपल्याला एका दिग्गज खेळाडूने मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे.

राहुल याबाबत म्हणाला की, " संघातून मला बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा मी भारतीय 'अ' संघातून खेळत होतो. त्यावेळी राहुल द्रविड हे आमचे प्रशिक्षक होते. त्यांनी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला समजवून सांगितल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी संघात परतलो आणि माझ्याकडून चांगल्या धावा होत आहेत."

टॅग्स :लोकेश राहुलकॉफी विथ करण 6