Join us

LMOTY 2018:विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमकच – रवी शास्त्री

धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 20:03 IST

Open in App
ठळक मुद्देस्लेजिंग करण्यात काहीच चुकीचं नाही, पण ते तुम्ही कसं करता हे महत्वाचं. कारण स्लेजिंग करताना खेळभावनेला कुठेही बट्टा लागता कामा नये.

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमकच आहोत, आमच्यामध्ये कुठलाही फरक नाही, असे स्पष्ट मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘ लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर २०१८ ‘ या पुरस्कार सोहळ्यातील खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले. या सोहळ्यात शास्त्री यांना ‘ महाराष्ट्राचा अभिमान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोहली आणि आपल्याबद्दलचे साम्य व्यक्त करताना शास्त्री म्हणाले की, “ मी आक्रमक आहे. आमची मानसीकता सारखीच आहे. आम्हाला आव्हान स्वीकारायला आवडतात. त्यामुळे संघाला मार्गदर्शन करत असताना मला कुठलीही अडचण येत नाही. मी जे काही मार्गदर्शन करतो, त्याचा योग्य अवलंब विराट मैदानात करतो. “

स्लेजिंग करणं योग्य की अयोग्य या प्रश्नावर शास्त्री म्हणाले की, “ स्लेजिंग करण्यात काहीच चुकीचं नाही, पण ते तुम्ही कसं करता हे महत्वाचं. कारण स्लेजिंग करताना खेळभावनेला कुठेही बट्टा लागता कामा नये. मी खेळाडूंना सांगतो जर कुणी तुम्हाला एक गोष्ट बोलला तर त्याला तीन गोष्टी ऐकवा. समोरच्याला तुम्हाला शांत करता आले पाहिले, पण त्यासाठीची पद्धत मात्र योग्य असायला हवी. “

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कोहली यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत, असे बोलले जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विचारल्यावर शास्त्री म्हणाले की, “ धोनी हा एक महान क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. पण धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत. आम्ही एक संघ आहोत, आमच्यासाठी फक्त एक खेळाडू महत्वाचा नाही. “

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८रवी शास्त्री