लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई क्रिकेटचा इतिहास आणि पराक्रमाचे दर्शन घडविणारे बहुप्रतीक्षित शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमच्या परिसरात उद्घाटन होईल. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संग्रहालयात लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा पुतळा प्रवेशद्वाराजवळ असेल.
या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गावसकर यांच्यासह ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचाही पुतळा असेल. या संग्रहालयातील मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी दिलेल्या दुर्मीळ व ऐतिहासिक आठवणींची अनमोल संग्रहित वस्तू. या वस्तूंमधून मुंबई क्रिकेटचा समृद्ध वारसा व भारतीय व जागतिक क्रिकेटमधील मोलाचे योगदान उलगडेल, तसेच येथे आधुनिक ऑडिओ- व्हिज्युअल अनुभव केंद्रदेखील आहे, जे मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण क्षण व गोष्टी प्रत्यक्षपणे अनुभवण्याची संधी देईल.
असा असणार पुतळा
‘एमसीए’ संग्रहालयातील दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचा पुतळा विशेष ठरणार आहे. दहा हजार कसोटी धावा पूर्ण करणारे क्रिकेटविश्वातील पहिले फलंदाज, अशी ओळख गावसकर यांची आहे. त्या यशाचा जल्लोष त्यांनी ज्या शैलीत साजरा केला होता, त्याच शैलीत गावसकर यांचा हा पुतळा असणार, अशी माहिती ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.
शरद पवार क्रिकेट संग्रहालय मुंबई क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना आदरांजली व शरद पवार यांच्या दूरदृष्टीचा गौरव आहे. हे संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या अद्वितीय वारशाचे जिवंत प्रतीक ठरेल आणि भविष्यातील क्रिकेटप्रेमींना प्रेरणा देईल. सुनील गावसकर यांचा पुतळा हा प्रामाणिकपणा, मेहनत व उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. त्यांचे क्रिकेटमधील योगदान तरुणांना सदैव मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करेल. - अजिंक्य नाईक, अध्यक्ष - एमसीए.