Lionel Messi to visit India: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटूलिओनेल मेस्सी १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात येत आहे. डिसेंबर महिन्यात तो भारतात असेल आणि एकूण तीन ठिकाणांना भेट देईल. मोठी बातमी अशी आहे की, हा सुपरस्टार विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर या दिग्गजांसोबत देखील दिसणार आहे. एका वृत्तानुसार, मेस्सी या दिग्गजांसोबत क्रिकेट सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
वानखेडेवर सामना कधी?
वृत्तांनुसार, लिओनेल मेस्सीमुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये येईल. तिथे तो ७ खेळाडूंचा क्रिकेट सामना खेळेल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील या सामन्यात सहभागी होतील. मेस्सी ३ दिवसांसाठी भारतात येत आहे. तो १३ ते १५ डिसेंबर दरम्यान कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला भेट देईल. १४ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमासाठी तो मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला भेट देईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनेक बडे क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एक २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही होता. त्यात भारत वर्ल्डचॅम्पियन झाला होता.
मेस्सी कोलकात्याला जाणार...
याशिवाय, मेस्सी कोलकातामध्येही जाणार आहे आणि ईडन गार्डन्स येथे त्याचा सन्मान केला जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. कोलकाता दौऱ्यादरम्यान, लिओनेल मुलांसाठी फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करतील आणि फुटबॉल क्लिनिकचेही उद्घाटन करेल. त्याच्या सन्मानार्थ 'गोट कप' स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. ६ जून रोजी, केरळच्या क्रीडामंत्र्यांनी पुष्टी केली की लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना फुटबॉल संघ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी केरळला भेट देईल. हा सामना तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. केरळ सरकारला याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
२०११ मध्ये आला होता मेस्सी...
लिओनेल मेस्सीने यापूर्वी २०११ मध्ये भारत दौरा केला होता. त्याने कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएला विरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. आता १४ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येत आहे. हे ऐकून सर्व फुटबॉल चाहते खूप आनंदी आहेत.