आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारनने पुन्हा एकदा आपल्या चाणाक्ष खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेल्या इंग्लंडच्या स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला संघात सामील करण्यासाठी १३ कोटी खर्च केले. विशेष म्हणजे, लिलाव संपल्यानंतर काही तासांतच लिव्हिंगस्टोनने आपल्या बॅटने मैदानावर अक्षरशः आग ओकली आणि त्याची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये का केली जाते? हे सिद्ध करून दाखवले.
लिलावाच्या पहिल्या फेरीत लियाम लिव्हिंगस्टोनवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती, ज्यामुळे तो अनसोल्ड ठरला. मात्र, जेव्हा त्याचे नाव दुसऱ्यांदा पुकारण्यात आले, तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांसारख्या बलाढ्य संघांमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर काव्या मारनने इतर सर्व संघांना मागे टाकत १३ कोटी रुपये खर्चून लिव्हिंगस्टोनला हैदराबादच्या ताफ्यात घेतले.
आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये अबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने डेझर्ट वायपर्सविरुद्ध अवघ्या ४८ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी केली. त्याने १५८ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार मारले. लिव्हिंगस्टोनच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर अबू धाबी नाईट रायडर्सने २० षटकांत १८१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा डेझर्ट वायपर्स संघ निकराची झुंज देऊनही १८० धावांपर्यंतच पोहोचू शकला. नाईट रायडर्सने हा सामना अवघ्या एका धावेने जिंकला.
सनरायझर्स हैदराबादला मधल्या फळीत एका आक्रमक फलंदाजाची गरज होती. लिव्हिंगस्टोनची सध्याची लय पाहता, काव्या मारनने लावलेली १३ कोटींची बोली सार्थ ठरणार असल्याचे दिसत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच लिव्हिंगस्टोनने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.