Legends League Cricket, Yusuf Pathan - युसूफ पठाण आणि इरफान पठाण या भावंडांनी पुन्हा एकदा भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. Legends League Cricketच्या पहिल्याच सामन्यात इंडियन महाराजा संघानं आशियाई लायन्स संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. आशियाई लायन्सनं विजयासाठी ठेवलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना इंडियन महाराजा संघाची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली होती. पण, त्यानंतर युसूफनं दमदार फलंदाजी करताना संघाला पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला. तत्पूर्वी इरफाननं दोन विकेट्स घेऊन आशियाई लायन्स संघाच्या धावांना ब्रेक लावला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या आशियाई लायन्सकडून उपुल थरंगा व कर्णधार मिसबाह उल हक यांनी चांगली खेळी केली. थरंगानं ४६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६६ धावा केल्या, मिसबाहनं ३० चेंडूंत ४४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ४ षटकारांचा समावेश होता. कामरान अकमल ( २५), मोहम्मद हाफिज ( १६) यांनीही थोडेफार योगदान दिले. मनप्रीत गोनीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. इरफाननं २२ धावांत २ बळी टिपले. स्टुअर्ट बिन्नी व मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना नमन ओझा ( २०), स्टुअर्ट बिन्नी ( १०) आणि एस बद्रिनाथ ( ०) हे ३४ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद कैफ व युसूफ यांनी शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. कैफ ४२ धावांवर नाबाद राहिला. युसूफनं तुफान फटकेबाजी सुरू केली. त्यानं ४० चेंडूत ९ चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं ८० धावा चोपल्या.
इरफान पठाणनं १० चेंडूंत नाबाद २१ धावा करून इंडियन महाराजाचा विजय पक्का केला.